Indian Embassy : भारतीय दूतावासात पाकिस्तानसाठी हेरगिरी, भारतीय लष्कराची माहिती ISI पुरवली; कोण आहेत सतेंद्र सिवाल?
Who is Satendra Siwal : यूपी एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सतेंद्र सिवाल याला अटक केली आहे. सतेंद्र उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
ISI Spy Arrested : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) एटीएसला (ATS) दहशतवादविरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. यूपी एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय तरुणाला अटक केली आहे. हा तरुण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत होता. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 4 फेब्रुवारीला, मॉस्को दूतावासात काम करणाऱ्या सतेंद्र सिवाल या भारतीय नागरिकाला पाकिस्तानी दहशतवादी संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. आरोपी सतेंद्र सिवाल रशियाच्या भारतीय दुतावासात मल्टी टास्किंग स्टाफमध्ये होता. मॉस्कोमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र सिवाल याला अटक झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. सतेंद्र सिवाल पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे.
भारतीय दूतावासात पाकिस्तानसाठी हेरगिरी
यूपी एटीएसने लखनौमधून आरोपी सतेंद्र सिवालला अटक केली. सतेंद्र सिवालने पाकिस्तानची दहशतवादी संस्था आयएसआय समर्थक गुप्तचर संस्थांना गोपनीय माहिती पुरवली, असं एटीएसनं सांगितलं आहे. सतेंद्र सिवालच्या अटकेची माहिती परराष्ट्र मंत्रालयालाही देण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयचे समर्थक परराष्ट्र मंत्रालयाच्या काही कर्मचाऱ्यांना धोरणात्मक माहिती मिळविण्यासाठी पैशाचे आमिष दाखवत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सिवाल भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी
एटीएसने तंत्रज्ञानाचा वापर करत आणि त्याच्यावर पाळत ठेवत तपास केला. तपासादरम्यान सिवाल पाकिस्तानच्या आयएसआय हँडलर्ससह भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचं आढळलं. सिवालने पैशासाठी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी आस्थापनांच्या धोरणात्मक रणनीतीविषयी संवेदनशील माहिती लीक केल्याचा दावा एटीएसने केला आहे.
एटीएसच्या फील्ड युनिटकडून सिवालची चौकशी
सुत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सिवालने आरोप मान्य केले आहेत. एटीएसने त्याच्याकडील दोन फोन जप्त केले आहेत. तपासानंतर सिवालला मेरठमधील एटीएस फील्ड युनिटमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले. सिवालने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. आयपीसी कलम 121ए (देशाविरुद्ध युद्ध पुकारणे) आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, 1923 अंतर्गत लखनऊ येथील एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सतेंद्र सिवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे सतेंद्र सिवाल?
सतेंद्र सिवाल हा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील शाहमहिउद्दीनपूर गावचा रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचे नाव जयवीर सिंग आहे. सतेंद्र मल्टी टास्किंग स्टाफमध्ये कार्यरत होता. सतेंद्र सिवाल 2021 पासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासात भारत आधारित सुरक्षा सहाय्यक (IBSA) म्हणून काम करत होता.