तेलंगणात मोठी दुर्घटना, कबड्डी सामन्यादरम्यान भीषण गर्दीमुळे गॅलरी कोसळली, 100 हून अधिक जखमी
तेलंगाणाच्या सूर्यापेटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात कमकुवत लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल्या संरचनेमुळे झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेचं खरं कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होईल.

हैदराबाद : तेलंगाणाच्या सूर्यापेटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. 47वा राष्ट्रीय ज्युनियर कब्बडी स्पर्धेच्या प्रारंभाच्या सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अशातच अचानक एक गॅलरी तुटून पडली. जवळपास 1500 लोक खाली पडले. या दुर्घटनेत 100 हून जास्त लोक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशातच दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना पुढिल उपचारासाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार आहे.
दुर्घटनेबाबत माहिती देताना सूर्यापेटचे एसपी म्हणाले की, अद्याप दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार, हा अपघात कमकुवत लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल्या संरचनेमुळे झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेचं खरं कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होईल.
स्थानिक माध्यमांनी दाखवलेल्या व्हिज्युअल्समध्ये गॅलरी कोसळल्यामुळे लोक खाली पडताना दिसून येत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलरी कोसळल्यानंतर गर्दी खाली कोसळली आणि लोक खाली पडले. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर लगेचच अॅम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांमधून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मैदानात प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी तीन गॅलरी तयार केलेल्या
सूर्यापेटच्या या मैदानात तीन गॅलरी उभारण्यात आल्या होत्या. प्रत्येक गॅलरीमध्ये जवळपास 5000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर मैदानात जवळपास 15 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था होती. देशातील 29 राज्यांमधून कबड्डीचे खेळाडू येथे आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स; Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर
- Corona Vaccination: कोरोना लसीमुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
- Coronavirus in Maharashtra | राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो : आरोग्यमंत्री राजेश टोपे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
