Karamsad Protest : तब्बल 400 कोटी खर्च करून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', तरीही सरदार पटेलांच्या मूळ गावातील लोक नाराज, आता आंदोलनाचा पवित्रा
Statue of Unity : 'मीही सरदार' अशा घोषणा देत सरदार पटेलांच्या मूळ गावातील लोकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Karamsad Protest : दिल्लीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपकडून जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पण त्याचवेळी मोदींच्या राज्यात, म्हणजे गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूळ गावात मात्र आंदोलनाची तयारी सुरू आहे. करमसद या गावातील लोकांनी राज्य सरकारच्या एका निर्णयाला विरोध करत आंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचे मूळगाव असलेल्या करमसद या गावाचा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आणंद या महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविरोधात गावातील लोकांनी मात्र आवाज उठवला असून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
Karamsad Protest : गावाची ओळख स्वतंत्र ठेवण्याची मागणी
सरदार सन्मान संकल्प आंदोलन समिती करमसदच्या बॅनरखाली होणाऱ्या आंदोलनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांची मागणी आहे की सरदार पटेल यांचे गाव मूळ स्वरुपातच राहू द्यावे. त्यांनी करमसद वाचवा अभियान सुरू केले आहे. त्यासाठी 'मीही सरदार' अशी घोषणा देत लढ्याचा नारा बुलंद केला आहे.
शासनाने नुकतीच आणंद नगरपालिकेला महानगर पालिका म्हणून घोषित केले आहे. यामध्ये करमसद गावाचाही समावेश करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत. फक्त याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. त्याच्याविरोधात पटेलांच्या गावातील लोकांनी आंदोलन सुरू केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राज्यातील केवडियामध्ये सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळा बसवण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा हा पुतळा 380 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. पीएम मोदी दरवर्षी एकता दिनी केवडियाला पोहोचतात. आता त्याच सरदार पटेलांच्या मूळ गावातील लोकानी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
सन 2015 मध्ये गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाबाबत राज्यात 'जय सरदार'चा नारा घुमला होता. त्यावेळी हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे भाजपला चांगलाच फटका बसला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या 99 जागा कमी झाल्या. आंदोलनानंतर काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेल यांच्यावरील देशद्रोहाचा खटला मागे घेण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली आहे. सरदार पटेल यांचे गाव आणंद जिल्ह्यात आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

