जगातील सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळतं? एका देशात नाममात्र व्याज, तर 'या' देशात 170 टक्के व्याजदर
Lowest Interest Rate In World : आपल्या देशात विविध कर्जांवर 8 ते 16 टक्के व्याजदर आकारला जातो. पण जगातला असा एक देश आहे त्या ठिकाणी नाममात्र फक्त दीड टक्के व्याजदर आकारलं जातं.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याची घोषणा करून मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे, ज्यामुळे रेपो रेट 6.50 वरून 6.25 वर आला आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांसाठी हा एक प्रकारचा दिलासा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अधिकाधिक कर्ज घेतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेस असा त्यामागे हेतू असतो. पण तुम्हाला माहित आहे का जगातील कोणत्या देशात सर्वात कमी व्याजदर आहे?
कोणत्या देशाला सर्वात कमी व्याज?
जगभरातील सर्व देशांमध्ये कर्जाबाबतचे नियम वेगवेगळे आहेत. काही देशांत कर्ज घेताना भरपूर व्याज द्यावे लागते, तर काही देश असे आहेत की जेथे कर्ज घेताना नाममात्र व्याज द्यावे लागते. 2023 मध्ये 83 देशांमध्ये सरासरी कर्जाचा व्याजदर 14.19 टक्के होता. तर स्वित्झर्लंडमध्ये, सरासरी कर्जाचा व्याज दर 1.50 टक्के होता. याउलट सर्वाधिक व्याज दर झिम्बाब्वेमध्ये आकारला जातो. त्या ठिकाणी ग्राहकांना कर्जावर 170.29 टक्के व्याज द्यावे लागले.
भारतात किती टक्के व्याजदर?
भारतीय बँकांमधील कर्जावरील व्याजदर कर्जाचा प्रकार, बँक आणि अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, कृषी कर्जावर 5 टक्क्यांपेक्षा कमी व्याज आकारले जाते. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 11.45 टक्के ते 14.85 टक्के प्रतिवर्ष आहे. याशिवाय, खाजगी बँक HDFC मधील वैयक्तिक कर्जावरील व्याज दर प्रतिवर्ष 10.85 टक्क्यांपासून सुरू होतो. कर्जाच्या प्रकारावर व्याजदर ठरवला जातो.
बँका व्याज का आकारतात?
जगभरातील बहुतांश बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज दिल्यावर त्यावर व्याज आकारतात. मात्र सर्व खासगी आणि सरकारी बँकांचे व्याजदरही वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे आरबीआय भारतात जे व्याज घेते आणि ग्राहकांना देते, त्याचे दर जगातील इतर देशांमध्ये भिन्न आहेत.
कर्ज घेणे सोपे झाले आहे
गेल्या दशकभरापासून कर्ज प्रक्रिया सुलभ होत आहे. आज सर्वसामान्य माणूसही सहज कर्ज घेऊ शकतो. तथापि, तुम्ही ज्या उद्देशासाठी कर्ज घेत आहात त्यानुसार बँक व्याज ठरवते. उदाहरणार्थ, भारतात, शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे दर खूपच कमी आहेत. परंतु याशिवाय वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज घेण्यावर खूप जास्त व्याज द्यावे लागते. कर्ज आणि व्याज यासंबंधीचे नियम आणि सबसिडी जगभरातील सर्व देशांमध्ये भिन्न आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
