Andhra Pradesh Assembly Election 2024 : आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) मुस्लिम आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. आम्ही आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवू, कोणतीही अडचण नाही, असे म्हटले आहे.
Andhra Pradesh Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता सेना पक्ष यांच्या युतीमध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) मुस्लिम आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते आर. रवींद्र कुमार यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण भविष्यातही कायम राहील, असे म्हटले आहे.
आम्ही आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवू, कोणतीही अडचण नाही
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आर. रवींद्र कुमार म्हणाले, "हो, आम्ही आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवू. त्यात कोणतीही अडचण नाही." के रवींद्र कुमार यांची ही टिप्पणी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या आश्वासनानंतर एका महिन्यानंतर आली आहे. महिनाभरापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी असेही म्हटले होते की, त्यांचा मित्रपक्ष भाजपने धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याचा दावा केला असला तरी त्यांचा पक्ष आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार आहे.
चंद्राबाबू नायडू यांचाही पाठिंबा
5 मे 2024 रोजी पत्रकारांशी बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, "आम्ही सुरुवातीपासून मुस्लिमांना चार टक्के आरक्षणाचे समर्थन करत आलो आहोत आणि हे पुढेही चालू राहील." लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी असे म्हटल्याच्या काही दिवसांनंतर टीडीपी प्रमुखांनी हे सांगितले होते. लोकसभा प्रचारात नरेंद्र मोदी यांनीदलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यातील आरक्षण मुस्लीमांना धर्माच्या आधारावर देणार नसल्याचे म्हटले होते.
आंध्र प्रदेशात एनडीए आघाडीला प्रचंड बहुमत
चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी एनडीए आघाडीचा भाग आह. टीडीपीने वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीचा दारुण पराभव केला. अभिनेता ते राजकारणी पवन कल्याण यांची जनसेना देखील युतीचा एक भाग आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 175 पैकी 164 जागा जिंकून एनडीएने प्रचंड बहुमत मिळवले आहे. एनडीएमध्ये टीडीपीने 135, जनसेनेने 21 आणि भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या