MCD Result : दिल्ली महापालिकेवर कोण फडकवणार झेंडा? आज होणार स्पष्ट, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात
आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Delhi Municipal Corporation Result : दिल्ली महानगरपालिकेच्या (Delhi Municipal Corporation) दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी तीन वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण होणार आहे.
काय सांगतात एक्झिट पोल?
दिल्ली महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपनं तब्बल सात मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. मात्र, एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, आज निकाल लागल्यानंतरच नेमकं कोण बाजी मारणार हे समजणार आहे. एक्झिट पोलनुसार आपला या निवडणुकीत 149 ते 171 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या एक्झिट पोलनुसार भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीत भाजपला 69 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या खात्यात 03 ते 07 जागा येत आहेत. तसेच इतरांचा 05 ते 09 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. व्होट शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 10 टक्के मते मिळू शकतात, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी रविवारी (4 डिसेंबर) मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी सर्व 250 वॉर्डांमध्ये सुमारे 50 टक्के मतदान झाले होते.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्लीत 13 हजार 638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक 5 बख्तावरपूर येथे 65.72 टक्के तर सर्वात कमी 33.74 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 145 अँड्र्यूज गंज येथे झाले होते. आजच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांसह 10,हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.
मागील निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं?
2017 च्या निवडणुकीत दिल्ली महानगरपालिकेत भाजपने 181 जागा जिंदकल्या होत्या. एकूण 36.8 टक्के मते भाजपने घेतली होती. तर या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 49 जागा जिंकत 26.23 टक्के मते मिळवली होती. तर काँग्रेसला 31 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसला या निवडणुकीत 21.09 टक्के मते मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या: