(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lucknow Building Collapse: लखनौमध्ये तीन मजली इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू, ट्रक चालकानं जे घडलं ते सर्व सांगितलं
Lucknow Building Collapse News : लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगर येथे तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 28 हून अधिक लोक जखमी झाले. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
Lucknow Building Collapse Update लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक भाग काल सायंकाळी पाच वाजता कोसळला. या घटनेत आतापर्यंतच्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,28 जण जखमी आहेत. या इमारतीत औषध आणि तेल कंपन्यांची चार गोदामं होती, अशी माहिती आहे. तिथं, 30 कर्मचारी काम करायचे.
लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हरमिलाप टॉवर येथील तीन मजली इमारत कोसळली. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तिथं ट्रकमधून माल उतरवला जात होता. या टॉवरमध्ये औषधं, गिफ्ट, पॅकिंग, मोबिल ऑईल याची गोदाम होती. तिथून ते साहित्य इतर ठिकाणी पाठवलं जायचं.
या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ट्रक चालक राजेश पाल म्हणाला की सायंकाळी 4.55 वाजता तो या इमारतीमध्ये पोहोचला होता. त्यानं ट्रकमधून साहित्य उतरवण्यासाठी तो इमारतीत लावला होता. दिल्लीहून आणलेली औषधं उतरवुन घेण्याचं काम सुरु होतं, ते दुसऱ्या मजल्यावर नेलं जात होतं. हे काम जवळपास 15 ते 20 लोक करत होते तेवढ्यात इमारत कोसळली. कुणालाच काही समजलं नाही, साहित्य उतरवण्याचं काम करणाऱ्या लोकांनी पळत जाऊन जीव वाचवला. काही लोकांना स्थानिकांच्या मदतीनं आणि पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आल्याची माहिती देखील राजेश पालनं दिली.
स्थानिक प्रशासनानं या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरु केलं. यामध्ये स्थानिक पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लखनौ महानगर पालिकेची टीम सहभागी झाली होती. स्थानिक अधिकारी अमिताभ यश यांनी संपूर्ण इमारतीत शोध मोहीम सुरु असल्याची माहिती दिली.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त
लखनौमधील या इमारत दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील दु:ख व्यक्त केलं.
या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत, यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर मानली जात आहे. ही इमारत का कोसळली या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार पाणी भरल्यानं इमारतीचा पाया कमजोर झाला होता. या प्रकरणी तक्रार करुन देखील प्रशासनाकडून लक्ष देण्यात आलं नव्हतं असा दावा करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट नगर व्यापार मंडळाचे आणि गोदाम संघटनेचे प्रवक्ते राजनारायण सिंह यांनी पाणी साचलं नसतं ही घटना घडली नसती, असा दावा केला. तर, प्रशासनानं चौकशीनंतर या घटनेमागील कारण स्पष्ट होईल. साधारणपणे ही इमारत 15 वर्षांपेक्षा जुनी नव्हती.
इतर बातम्या :
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल