Assam Flood : आसाममध्ये 'जलप्रलय'! सुमारे 30 हजार लोकांना फटका, 175 गावं पाण्याखाली
Assam Flood Update : आसाममध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून सहा जिल्ह्यांना फटका बसला आहे. ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
आसाम : भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यात जलप्रलय आलं आहे. आसामधील सहा राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यातील सुमारे 30,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे.
आसाममध्ये भीषण पूरस्थिती
धेमाजी जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी अद्याप धोक्याची पातळीहून जास्त आहे. पुराचा सर्वाधिक फटका धेमाजी आणि दिब्रुगड जिल्ह्यांना बसला आहे. याचा थेट परिणाम धेमाजीमधील 19,163 आणि दिब्रुगड जिल्ह्यामधील सुमारे सहा हजार लोकांना बसला आहे. ASDMA नुसार, धेमाजी, दिब्रुगड, दररंग, जोरहाट, गोलाघाट आणि शिवसागर जिल्ह्यातील 175 गावं पाण्याखाली गेली आहेत.
पुरांमुळे हजारो नागरिकांना फटका, संसार उद्ध्वस्त
जोनई, धेमाजी, गोगामुख आणि सिस्सीबोरगाव महसूल मंडळातील 44 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिस्सीबोरगाव भागात झाला आहे. येथे 10,300 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुराचे पाणी पुढे सरकत असल्याने लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावं लागत आहे.
महापुरामुळे शेतीचं नुकसान
धेमाजी जिल्ह्यात एकूण 396.27 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पूरग्रस्त सहा जिल्ह्यांतील 2,047.47 हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अद्यापही नदीचा प्रवाह धोक्याच्या पातळीच्या वरती आहे. याशिवय शिवसागरमधील डिखू नदी आणि गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगडमधील धनसिरी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांच्या स्थलांतराचं कार्य प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
पुरामुळे जनावरांनाही फटका बसला
पुरामुळे फक्त माणसंचं नाही तर जनावरांनाही फटका बसला आहे. पुरामुळे सुमारे 20,000 हजार जनावरांना फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुशे धेमाजी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची दुरावस्था झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासोबतच त्यांना अन्न पुरवण्याचं काम प्रशासनानाकडून सुरु आहे.
आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' घोषित
आसाममध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं. केंद्र सरकारनं आसाम राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली होती. केंद्र सरकारकडून बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, सरकार पुनर्वसनाचा 90 टक्के खर्च उचलणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.