(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gondia News : चक्क जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचं अन्नत्याग आंदोलन; रस्त्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन
Gondia News : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ते तिरखेडी रस्त्याचे तात्काळ खड्डे भरण्याचे काम करावे आणि दोन महिन्यात नवीन रस्ता बनविण्यात यावा, रेल्वेनं ना हरकत देऊन सुद्धा धानोली-बाभणी मार्गाचं काम झालेलं नाही ते पूर्ण करावं, या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
Maharashtra Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि मागास म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात अनेक कामं प्रभावित झाली आहेत. या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनाचीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप करत जि. प. सदस्या विमल कटरे यांनी गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे या देखील अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ते तिरखेडी रस्त्याचे तात्काळ खड्डे भरण्याचे काम करावे आणि दोन महिन्यात नवीन रस्ता बनविण्यात यावा, रेल्वेनं ना हरकत देऊन सुद्धा धानोली-बाभणी मार्गाचं काम झालेलं नाही ते पूर्ण करावं, या मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.
परिसरातील गावातील सरपंचाचा आंदोलनाला पाठिंबा
सालेकसा तालुक्यातील तेरखेडी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे यांनी अनेक वेळा या रस्त्याच्या बांधकामाकरिता मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे यांनी तेथील पंचायत समिती सदस्य यांचे सोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला भजेपार येथील सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्यासह परिसरातील सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. तर भविष्यात मोठा लढा उभारण्याकरिता सर्व सरपंच रस्त्यावर उतरतील असेही बहेकार म्हणाले.
जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणतात हा तर श्रेय लाटण्याचा प्रयत्न
या संदर्भात जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या रस्त्याचा वर्क ऑर्डर निघाला असून लवकरच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत. मात्र जिल्हा परिषद सदस्यांनी सुरू केलेला हा आंदोलन फक्त श्रेय लाटण्यासाठी आहे असाही गंभीर आरोप बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी