Shirdi Crime : शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
Shirdi Crime : शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Shirdi Crime : शिर्डी पोलीस ठाण्याच्या (Shirdi Police Station) हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावळीविहीर बुद्रुक हद्दीत दोन गटात जोरदार राडा झालाय. यात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून वाहनात कोयते आणि चॉपर आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहन ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळीविहीर बुद्रुक भागात शुक्रवारी (दि. 21) सायंकाळी दोन गटात तुफान राडा झाला. या राडा सुरु असतानाच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी युवक घटनास्थळावरून चारचाकी वाहन सोडून फरार झाले.
दोन्ही गटातील युवकांचा शोध सुरु
या वाहनात कोयते आणि चॉपर आढळले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्री वाहन ताब्यात घेऊन वाहनातील कोयते आणि चॉपर हस्तगत केले आहेत. या प्रकरणी अद्याप शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. दोन्ही गटातील युवकांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. राड्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शिर्डीत 80 भिक्षेकरी ताब्यात
दरम्यान, शुक्रवारी शिर्डीत भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. पोलिस यंत्रणा, साईसंस्थान आणि नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करून 80 भिक्षेकऱ्यांना पकडण्यात आले. या सर्वांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी भिक्षेकरीगृहात केली जाणार आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर सर्वच यंत्रणांना जाग आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. यातील बहुतेक भिक्षेकरी हे विविध आजारांनी त्रस्त आहेत. बरेच जण व्यसनाधीन आणि दिव्यांग देखील आहेत.
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतापात नागरिकांनी पेटवले ट्रॅक्टर
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील गिधाडे बाळदे रस्त्यावर भरधाव वेगाने येणार्या रेतीच्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील मालुबाई कांतीलाल शिरसाट ही महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शिरपूर येथे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी दुचाकीला धडक देणारा ट्रॅक्टर जाळून आपला रोष व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
