शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात अवकाळीसह गारपीट होणार, 'या' भागाला फटका बसण्याची शक्यता
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातवरण असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातवरण असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिककारव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील 11 जिल्ह्यात आज गुरुवार ते रविवार म्हणजे 21 ते 23 मार्च दरम्यानच्या चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेंच मराठवाड्यातील नांदेड अशा 8 जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार अवकाळी बरोबर गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले.
मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा धोका नाही
मध्य महाराष्ट्रातील खांदेश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात सध्या जरी अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार 23 ते मंगळवार दि 25 मार्च दरम्यानच्या 3 दिवस ढगाळ वातावरणच राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसापेक्षा वीजा, वारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते. गारपीटीची शक्यता मात्र या 10 जिल्ह्यात जाणवणार नाही, असे वाटते.
उष्णतेची लाट नाही
आज दिनांक 21 ते 24 मार्च दरम्यानच्या पाच दिवसात, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा 2 ते 3 डिग्रीने कमाल तापमान घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र सध्या असलेल्या तापमानात विशेष बदल न होता, कायम राहील असे वाटते.
कशामुळं होतोय वातावरणात बदल?
बंगालच्या उपसागारातील 900 मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात 1500 मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे वाहत आहे. या दोन्हीही वाऱ्यांचा विदर्भादरम्यान होणाऱ्या संगमातून ऊबदार बाष्पाचा अवकाशात उरध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होणारा असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येत्या दोन दिवसात म्हणजेच 21 मार्च व 22 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे .
महत्वाच्या बातम्या:
सावधान! देशातील 18 राज्यात वादळ वारा पावसाचा इशारा, चक्रीवादळाचाही फटका बसण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

