(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lonar Lake : तब्बल 14 वर्षांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ, काय आहे कारण? वाचा सविस्तर...
तब्बल चौदा वर्षानंतर लोणार सरोवराच्या ( Lonar Sarovar) पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहेत.
Lonar Lake : बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणार सरोवर ( Lonar Sarovar) हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. या सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ (Rise in water level) झाली आहे. यंदा तब्बल चौदा वर्षांनी पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहेत. त्यामुळे लोणार सरोवर अभ्यासकांना आता चिंता सतावू लागली आहे. पण नेमकी लोणार सरोवराच्या पाणी पातळीत का वाढ झाली याबाबतची माहिती पाहुयात.
उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती
लोणार हे जगातील प्रसिद्ध सरोवर आहे. लोणार हे जगातल सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत तब्बल 14 वर्षानंतर मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे.
का झाली लोणार सरोवराच्या पाणी पातळी वाढ?
यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळं जमिनीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चांगल्या पावसामुळं लोणार सरोवरात असलेले झरे हे प्रवाहित झाले आहेत. अनेक पाण्याचे झरे हे डिसेंबर महिन्यात अजूनही वाहत आहेत. त्यामुळं लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहेत. आधीच या मंदिराची अवस्था जीर्ण झाली आहे. दरम्यान याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नसल्याचे येथील अभ्यासकांनी म्हटलं आहे.
लोणार सरोवराविषयी माहिती
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Lonar Lake : उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला शिंदे सरकारचे खतपाणी, लोणार सरोवर संवर्धनासाठी 370 कोटी रुपये निधी मंजूर