Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं राष्ट्रवादीच्या अधिवेशनात भावूक भाषण. अजितदादांचे आभार मानताना गलबलून आलं. सुरेश धसांना लगावला टोला.
शिर्डी: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपांची राळ उठून पालकमंत्रीपद गेल्यानंतर राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या पक्षाचे आभार मानले. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मकोका लागलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता आहे. त्यामुळे देशमुख हत्याप्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीने जोर धरला होता. मात्र, अजित पवार यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अभय देत त्यांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडे यांनी पक्षाचे आभार मानले.
माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रुंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचचं ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्याला तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. अविश्वास दाखवून काय होणार ? उद्या पक्षाने मी अजितदादांना शब्द देतो, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. उद्या माझ्यावर पाँडेचरीची जबाबदारी दिली ना तरी मी पूर्ण मनापासून ती जबाबदारीने पार पाडेन, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. तुम्ही शिव-शाहू-फुले यांच्या विचाराचे आहात का ? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आपला एकमेव पक्ष आहे जो शिव-शाहू-फुले यांच्या विचाराने चालतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवा: धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. पाच ते आठ गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे. असे करु नका, ही माझी हात जोडून विनंती असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
आणखी वाचा