(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lonar Lake : उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला शिंदे सरकारचे खतपाणी, लोणार सरोवर संवर्धनासाठी 370 कोटी रुपये निधी मंजूर
Lonar Lake : लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी 370 कोटी रूपये निधी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई : लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी 370 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा मोठा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास व संवर्धनासाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा 170 कोटी जास्त देत 370 कोटीच्या निधी देण्याची घोषणा केली आहे .उद्धव ठाकरेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंनी मोठं खतपाणी दिल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आणि जगातील दुसरं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे. भोवताली असलेल्या जंगलाला आता संरक्षित व धोकादायक वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराचा विकास खुंटला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराचा दौरा करुन विकासासाठी मोठ्या घोषणाही केल्या होत्या. पण वर्ष उलटून गेल्यावरही लोणार परिसरात कुठलही विकासाच काम सुरु झालं नाही. या वर्षीही चार महिन्याआधी राज्यपालांनी सुद्धा लोणार सरोवराचा दौरा करुन अनेक मान्यता दिल्या पण कुठल्याही विकासाला चालना मिळाली नाही. अखेर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने 370 कोटीचा निधी जाहीर केला आहे. निधी मिळाल्याने आता तरी लोणारचा विकास होईल का? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.
लोणार सरोवराच्या भवताली आहे मोठं जंगल संपदा
लोणार सरोवर हे जागतिक किर्तीचं पर्यटन केंद्र असल्याने जगभरातून लोणार सरोवराला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. लोणार सरोवराभोवती मोठं जंगल आहे आणि या जंगलात रहिवाशांनी अतिक्रमण करुन अधिवास थाटला आहे आणि त्यामुळे या जंगलातील वन्यजीव हे धोक्यात आले आहेत. लोणारच्या भोवताली जंगलात विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ पक्षी, प्राणी आहेत आणि त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे.
उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती
लाखो वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सुमारे 20 लाख टन वजनाची उल्का जोरदार वेगाने पृथ्वीवर आदळली. त्यामुळे पृथ्वीवर 1.8 व्यासाचा आणि 200 मीटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. हे सुंदर आणि खाऱ्या पाण्याचं अनोखं सरोवर पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात.