बॉक्स ऑफिस म्हणणार, 'झुकेगा नहीं साला'; अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 3' कधी रिलीज होणार? मेकर्सकडून मोठी अपडेट
Pushpa 3 Rampage Release Date: गेल्या वर्षी 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच वेळी, चित्रपट निर्मात्यानं आता पुष्पाच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या पार्टसंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे.

Pushpa 3 Rampage Release Date: साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) गेल्या डिसेंबरमध्ये रेकॉर्डब्रेक कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच आता ही ब्लॉकबस्टर फ्रँचायझी पुढच्या अॅड्रेनालाईन-फ्लूलवाल्या तिसऱ्या पार्टसाठी सज्ज होत आहे. पुष्पाभाऊच्या चाहत्यांचा उत्साह वाढवत,निर्मात्यांनी 'पुष्पा 3 - द रॅम्पेज'च्या (Pushpa 3 : The Rampage) रिलीजची डेट जाहीर केली आहे. त्यामुळे पुष्पाभाऊला तिसऱ्या पार्टमध्ये भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
'पुष्पा 3 : द रॅम्पेज' कधी रिलीज होणार?
'पुष्पा 2 : द रुल' चा प्रीमियर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. या चित्रपटाला जागतिक बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. या चित्रपटानं सुमारे 1,750 कोटींची कमाई केली आणि भारतातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला. आता, माध्यमांशी बोलताना, निर्माते रविशंकर यांनी खुलासा केला की, पुष्पाचा तिसरा भाग 2028 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याचं कारण असं की, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन सध्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यक्त आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीसोबत अल्लू अर्जुन एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्याला सर्वात आधी ते काम पूर्ण करावं लागेल आणि नंतर तो त्रिविक्रमसोबत एक चित्रपट करेल.
अल्लू अर्जुनचे दोन्ही प्रोजेक्ट्स पुढच्या दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविशंकर यांनी असंही सांगितलं की, पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार देखील वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. सध्या ते आणि राम चरण एका चित्रपटामध्ये व्यस्त आहेत.
View this post on Instagram
'पुष्पा 2 : द रुल'च्या तुलनेत 'पुष्पा 3' सर्वात मोठा चित्रपट?
फिल्मचे डायलॉग रायटर श्रीकांत विसानं काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की, 'पुष्पा 3' 'पुष्पा 2 : द रुल'च्या तुलनेत मोठा, भव्य आणि उत्तम असणार आहे. फिल्ममध्ये प्रेक्षकांना आणखी जास्त कॅरेक्टर्स पाहायला मिळणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्यासाठी एका मोठ्या बॉलिवूड स्टारला घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही.
पुष्पा फ्रँचायझीची सुरुवात 2021 मध्ये पुष्पा – द राइजने झाली, या चित्रपटानं जगभरात 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनला, ज्यामुळे निर्मात्यांना सिक्वेलसह कथा पुढे नेण्यास मदत झाली. त्यानंतर 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, विक्रमी ओपनिंग मिळवली आणि आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला. त्यामुळे आता पुष्पा 3 कडून सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

