Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Dhananjay Munde ON Suresh Dhas: आज शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी 'मैं आईना हुं, आईना दिखाऊंगा', अशा शब्दांमध्ये सूचक इशारा धस यांना दिला आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) अपहरण आणि हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमदार यांनी एकत्रित येत प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप झालेला वाल्मिक कराडसह (Walmik Karad) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रामुख्याने हे प्रकरण समोर आल्यापासून भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने याबाबत आक्रमकपणे बोलत धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) टार्गेट केलं आहे. वाल्मिक कराडचा (Walmik Karad) आका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आहे, ते वाल्मिक कराडला पाठिशी घालत आहेत, त्यांच्यामुळे बीडची गुन्हेगारी वाढली, असे एका ना अनेक आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले होते. त्यावर आज मुंडेंनी चार शब्दांमध्ये सुरेश धस यांना सूचक इशारा दिला आहे.
आज शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी 'मैं आईना हुं, आईना दिखाऊंगा', अशा शब्दांमध्ये सूचक इशारा धस यांना दिला आहे. दरम्यान राजीनाम्याच्या मागणीवरून आणि इतर आरोपांबाबत बोलताना मुंडे म्हणाले, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक करत हे आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी अजित दादांवर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याच समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी हे केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला. 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळीत एक आहे. याला बदनाम करू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
धनंजय मुंडे शिर्डीत शिबिरासाठी दाखल
मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार पडत असलेल्या शिबिरासाठी दाखल झाले आहेत. पहाटे चारच्या सुमारास धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. आज शिबिराचा दुसऱ्या दिवशी मुंडे शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. पहाटे चार वाजता धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. मुंडे यांची काल नवसंकल्प शिबिराला दांडी मारली, पण आज त्यांनी हजेरी लावली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर होत आहे. या खंडणीमुळेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याने कराडला पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप झाला आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे.