आजीच्या निधनानंतर तिन चिमुरड्यांनी घेतलेल्या निर्णयाचं औरंगाबादकर करतायेत कौतुक!
आपल्या आजीला कँन्सर झाल्याचे तिचे डोक्यावरील केस गळाले होते. हे दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून आजीच्या तीन नातींना घेतलेल्या निर्णयाचं आता सर्वच थरातून कौतुक होत आहे.

औरंगाबाद : ही बातमी आहे आजी आणि नातीच्या निखळ प्रेमाची. आजीच्या प्रेमापोटी 3 चिमुकल्या मुलींनी केलेल्या त्यागाची. मुलींना आपले लांब सडक केस म्हणजे जीव की प्राण. पण आपल्या आजीच्या आठवणीसाठी त्यांनी ते दान केले. आपली आजीचा कॅन्सरने मृत्यू झाला. उपचारादरम्यान आपल्या आजीचे केस गळाले, असेच इतरांचेही केस गळत असतील त्यामुळे त्यांना समाजात वावरताना लज्जा वाटत असेल. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून त्यांच्यासाठी केस दान करण्याचा निर्णय घेतला.
कॅन्सरग्रस्त रूग्ण बघितला तर पहिलं लक्ष हे त्यांच्या केसांवर जातं. उपचारादरम्यान त्यांचं शरीर तर थकलेलं असतंच पण केमोथेरपीमुळे गळालेल्या केसांचं शल्य त्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसतं. समाजात वावरताना केस नसल्याचं शल्य त्यांच्या मनात असतं. अशा व्यक्तींसाठी आत्तापर्यंत आपण सतरा अठरा वर्षांच्या तरुणीने आपले केस दान केल्याचे ऐकलं असेल. पण, औरंगाबादेत तीन चिमुकल्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. तसं यांचं वय पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हा विचार येणं हेच फार महत्त्वाचं आहे. औरंगाबादेतील मायरा झयादी 6 वर्षाची, फातिमा ताहूरा 7 तर रिसालत जाफरी 8 वर्षांची आहे. यांची आजी नसीम मसुमा 60 वर्षांच्या असताना कॅन्सरने त्यांचं निधन झालं. या तीनही बहिणी आपल्या आई-वडिलांना नेहमी प्रश्न विचारायचा की आपल्या आजीला केस का नाहीत. त्यावेळेस आई वडील सांगायचे की आजीला कॅन्सर झालाय आणि त्यामुळे त्यांचे केस गळाले आहेत. मुली प्रश्न विचारायचा की आमचे केस कसे काय येतात मग? आम्ही केस दिले तर ते परत येतात, आपल्या आजीला केस यायचे असतील तर काय करावे लागेल? त्यावेळी उत्तर द्यायचे कि कुणी तरी केस दान करावे लागतील. त्यावेळेस त्यांचा विग करता येईल आणि मग तो आजी घालेल. त्याच काळात आजीचं निधन झालं. मुलींच्या मनामध्ये आईने सांगितलेली गोष्ट खोलवर रूजली होती.
सहा महिन्यांपासून आई-वडिलांकडे धरला हट्ट
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे हट्ट धरला की आम्हाला केस दान करायचे आहेत. आईला वाटलं मुली अशाच म्हणत असतील त्यामुळे त्यांनी टाळाटाळ केली. पण मुली ऐकायचं नाव घेताना दिसत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. केस दान करण्यासाठी मुंबईला जावं लागणार होतं. त्यात त्यांना माहिती मिळाली की औरंगाबादमध्ये देखील तेच काम करता येते. तीनही चिमुरड्या औरंगाबादच्या हर्षा आणि संजय सलूनमध्ये आल्या. त्यांच्या चेहर्यावर प्रचंड आनंद होता. कोणालाही विश्वास बसत नव्हता की या वयात या मुलींनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आजीसाठी केस दान केले आहेत, याचा आनंद आजही त्यांना आहे. औरंगाबादकर त्यांचं कौतुक करत आहेत. ऑनलाईन क्लासेसच्या दरम्यान शिक्षिकेने देखील त्यांचं कौतुक केलं. आज त्या हे आनंदाने सांगतात.
त्यांनी दान केलेले केस हे टाटा मेमोरियल संस्थेला पाठवण्यात येणार आहेत. टाटा मेमोरिअल संस्थेमार्फत कॅन्सरग्रस्त रूग्णांना केसाचा विग देण्यात येतो. 'मदत संस्था' टाटा रूग्णालयामार्फत हे कार्य करते. केसदान केल्यानंतर सर्वात प्रथम त्याचं वर्गीकरण केलं जातं. पाच ते सहा डोनरने केसदान केल्यानंतर त्याचा एक विग बनतो. या मुलींचे वय जरी लहान असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय निश्चितच मोठा आहे. शिवाय इतरांना देखील आदर्शवत आहे. मुळातच त्यांच्या मनात हा विचार येणं आणि तो कृतीत उतरवून त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
