India Post Recruitment 2024: दहावी पास असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी; 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?
India Post GDS Recruitment: बंपर भरती प्रक्रियेसाठी एक लिंक इंडिया पोस्टकडून जारी करण्यात आली आहे. या लिंकवर जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.
India Post GDS Recruitment 2024: भारतीय टपाल सेवा (Indian Postal Service) म्हणजेच, इंडिया पोस्टनं (India Post) GDS च्या बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी (Recruitment 2024) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच, काही दिवसांत या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment Process) एक लिंक इंडिया पोस्टकडून जारी केली जाईल. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक सक्रिय झाल्यानंतर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी सोमवार, 15 जुलै 2024 पासून नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. याच वेबसाईटवरुन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येईल, तसेच, इथून मंडळनिहाय रिक्त जागांची संपूर्ण माहिती देखील मिळेल.
भरती प्रक्रियेसाठी वेबसाईट कोणती?
भारतीय टपाल सेवेच्या GDS पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी indiapostgdsonline.gov.in. या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल.
भरती प्रक्रियेतंर्गत किती पदं भरली जाणार?
काही काळापूर्वी इंडिया पोस्टनं एक शॉर्ट नोटीस जारी केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेतून सुमारे 35 हजार पदं भरली जातील, असा अंदाज होता. पण, यापेक्षा जास्त पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय पोस्टच्या GDS भरतीद्वारे, 44 हजार 288 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही पदं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, एमपी, राजस्थान, झारखंड इत्यादींसाठी आहेत.
कोणाला करता येणार अर्ज?
मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. तुम्ही ज्या प्रदेशासाठी अर्ज करत आहात त्या प्रदेशाच्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच सायकल कशी चालवायची हे देखील जाणून घेतले पाहिजे. दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. ही पदं ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर यांची आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
या पदांसाठी अर्ज 15 जुलैपासून सुरू होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्ज करा. या तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरा. या पदांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, निवडीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. गुणवत्ता यादी दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
प्रतिमाह किती वेतन मिळणार?
अर्ज केल्यानंतर उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल. वेगवेगळ्या पदांनुसार, वेगवेगळं वेतन मिळेल. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार 10,000 रुपये ते 24470 रुपये प्रति महिना असेल. तर बीपीएम पदाचा पगार 12 हजार ते 29,380 रुपयांपर्यंत आहे. याबद्दल कोणतंही अद्यतन किंवा तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट उमेदवारांनी तपासत रहावी.