एक्स्प्लोर

तुम्हाला कोण हवंय? माणसं की गाढवं?

नाटकाने आपल्यावरची बंधनं झुगारून द्यायची गरज आहे. अभिव्यक्तीचं एकमेव माध्यम असलेली नाटक कला रूजली पाहिजे. समाज म्हणून आपणही तिच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. असं पाठबळ मिळालं तर समाजात विचारशील माणसं तयार होतील अन्यथा उरतील ती गाढवं. अशी रोखठोक मतं मांडली आहेत अभिनेता सुबोध भावेने. आजच्या जागतिक रंगभूमी दिनी 'एबीपी माझा'सोबत शेअर केलेले त्याचे विचार आत्मपरिक्षण करायला लावणारे आहेत.

सुबोध भावे...

मधल्या काही काळात मी नाटकापासून दूर होतो. तरी काही काळ म्हणजे, जवळपास पाच सहा वर्षं मी नाटक करत नव्हतो. कारण त्या त्या वेळी नाटकाची म्हणून जी व्यावसायिक गणित होती, त्यात नाटक करणं मला शक्य नव्हतं. म्हणजे, प्रयोगांची एकूण संख्या आणि माझे इतर व्याप यांची सांगड घालता येत नव्हती. पण नाटकात काम करण्याची खाज काही स्वस्थ बसू देईना, मग मधल्या काळात मी एका बालनाट्यात काम केलं. म्हणजे ज्या नाट्यसंस्थेतून मी लहानपणी नाटकातून कामं केली. आता इतक्या वर्षांनी त्याच नाटकातून मी पुन्हा एकदा काम केलं. लहानपणी केलेल्या नाटकांमुळेच तर मी घडत गेलो. मीच कशाला, मुळात नाटक ही अशी गोष्ट आहे, जिच्या माध्यमातून मराठीतले 90 टक्के कलाकार घडले. आपल्याकडची नाटकाची परंपरा आणि त्याचं प्रस्थ हे इतर भाषांच्या तुलनेत जास्त आहे. उलट त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की जगातली आपली अशी एकमेव रंगभूमी आहे जिथे इतक्या वैविध्याने आणि इतक्या संख्येने आपल्याकडे प्रयोग होत असतात, तेही वर्षभर.

अर्थात मग बऱ्याच वर्षांनी मी नाटक करायचं ठरवलं. नाटकाचं नाव अर्थातच अश्रुंची झाली फुले. हे नाटक करतानाच मी ठरवलं होतं की या नाटकाचे केवळ मुंबई पुण्यात नव्हे, तर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोग करायचा. सहा वर्षानंतर मी जेव्हा रंगभूमीवर पाय ठेवला त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या रंगभूमीवर मला काम करायचं आहे, त्याची अवस्था फार सुधारलेली नव्हती. प्रेक्षकांना असलेली समज याबद्दल बोलायचं तर नाटक बघताना आपण काय काळजी ध्यायला हवी हेच त्यांना कळत नाहीय. म्हणजे 14 वर्षांपूर्वी मी 'कळा या लागल्या जीवा' नाटक करत असताना मोबाईल बंद ठेवा अशी सूचना मला करावी लागे, तशीच सूचना मला आत्ताही करावी लागते. म्हणजे तेव्हा ज्या सूचना मी करायचो त्याच सूचना आत्ताही कराव्या लागतात. म्हणजे या 14 वर्षाच्या काळात कलाकार म्हणून मी प्रगल्भ झालो. समृद्ध झालोच की. कारण या काळात आम्ही केलेल्या नाटकांनी, कलाकृतींनी आम्हाला खूप काही दिलं. पण मग प्रेक्षकांचं काय? अर्थात सगळे प्रेक्षत तसे नाहीत. पण मूठभर प्रेक्षकांमुळे जी नाटकामध्ये बाधा येते, त्या प्रेक्षकांची प्रगल्भता शून्य आहे असंच म्हणावं लागेल. बरं, त्याचं त्यांना काही वाटतही नाही. उलट त्यातल्याच काही महाभागांचं म्हणणं असतं की कलाकारांनी त्यांचं काम नीट करावं वगैरे.. तर अशांनी आम्हा कलाकारांना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. कारण प्रयोग कसा करायचा ते आम्हाला नक्की कळतं. कारण आम्ही पैसे घेऊन काम करत असतो. मुळात आम्ही काय करावं हा मुद्दा इथे नाहीच. अरे, तुम्ही नाटकाला येताय ना.. मग नाटकाचे असे काही नियम असतात. ते तुम्हाला मान्य असतात ना मग ते पाळायचे असतात. म्हणजे, देवळात जाताना आपण बाहेर चपला काढतो ना? की चप्पल घालून आत गेल्याने देवाला काय फरक पडणार आहे अशा शहाणपणाच्या गोष्टी करू लागतो? तर नाही. आपल्याला तो नियम मान्य असतो म्हणून आपण देवळात जातो. मग नाटकाचंही तसं आहे. नाटकाचेही नियम असतात. तुमच्यासमोर एक जिवंत कला सादर होते आहे तर त्याचा आनंद घेणं हे तुमचं काम आहे. असो.

Movie Review | सशक्त अभिनयाने तारलेलं 'मीडियम'

माझ्याबाबतीत म्हणाल तर एका पॉइंटनंतर मला अशा सूचना करूनही कंटाळा आला आहे. मी केलेल्या कलाकृतींनी नाटकांनी मला इतकं समृद्ध केलं आहे की मी माझं काम चोख करतो. तुम्ही माझ्यासमोर ढोल जरी बडवत बसला तरी मला त्याचा फरक पडत नाही. कारण मी माझं काम नेटकं आणि उत्तम करणारच असतो.

तर अश्रुंची झाली फुले करत असताना मला अनेक अनुभव आले. जसं मी मघाशी म्हणालो, या नाटकाचे राज्यातल्या जिल्ह्यात प्रयोग करायचे आम्ही ठरवलं होतं. कारण पुणे आणि मुंबई पलिकडे असलेल्या महाराष्ट्रातल्या नाट्यरसिकांशी आम्हाला कनेक्ट व्हायचं होतं. म्हणजे असं बघा, पूर्वी नाटकाचे प्रयोग राज्यभर व्हायचे. नाटकाच्या निमित्ताने कालाकर मंडळी गावोगावी जायची. त्यांचा तिथल्या प्रेक्षकाशी, रंगकर्मींशी कनेक्ट असायचा. पुढे दौरे बंद झाले आणि हा कनेक्ट तुटला. आज कालाकर गावोगावी गेले तर जाता ते काही कार्यक्रमांसाठी बोलावणी आली तर. त्याला सुपारी असंही म्हटलं जातं. तिथला कार्यक्रम करायचा आणि निघायचं. अशाने गावागावांत असलेल्या नाट्यवेड्या प्रेक्षकांशी कनेक्ट होत नाही. हा नसलेला कनेक्ट आम्हाला पुन्हा जोडायचा होता. माझं नाटक करताना मला जाणवलं, की ग्रामीण भागात लोकांना नाटकाबद्दल कमालीची भूक आहे. यानिमित्ताने मला आभार मानायचेत ते गावोगावी रात्री अपरात्री प्रयोगानंतर जेवू घालणाऱ्या सर्व अन्नदात्यांचे. कमालीची आपुलकी आणि उत्साह असतो त्यांच्यात. तर नाटकाची अस्सल भूक असलेला हा प्रेक्षक महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे, आणि तो प्रचंड दुर्लक्षित झाला आहे. आता गरज आहे ती त्यांच्यापर्यंत नाटक घेऊन जाण्याची. आता नाटक घेऊन जायचं म्हणजे, खर्च आला. प्रवास, लॉजिस्टिक्स हा मुद्दा आहे. पण हे मुद्दे पूर्वीही होतेच आणि यापुढेही असणार आहेतच. पण खर्च आहे, म्हणून प्रयोग न करणं हा पर्याय ठरू शकत नाही. म्हणजे राज्यातल्या नाटयगृहांची अवस्था बिकट आहे हे मी यापूर्वीही वारंवार सांगितलं आहेच.

Ek Villain 2 | 'एक व्हिलन 2'च्या सीक्वेलमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार तारा सुतारिया

नाट्यगृहांवरून आठवलं, नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने आम्ही गोव्याला गेलो होतो. तिथली नाट्यगृहं पाहून मला वाटून गेलं की आपल्याकडे अशी नाट्यगृहं का नाहीत? गोव्यासारख्या छोट्या राज्यात इतकी सुसज्ज, व्यवस्थित नाट्यगृहं पाहून सतत असं वाटत राहिलं की आपल्याकडे का होत नाहीत अशी नाट्यगृहं. आता आपल्याकडे अशी नाट्यगृहं नाहीत म्हणून सरकारला सतत दोष देणंही योग्य नाही असं मला वाटतं. म्हणजे, नाट्यगृह ही काही फक्त सरकारची जबाबदारी नाही. याला इतरही घटक जबाबदार आहेत. यात सरकार, पालिका, कलाकार, निर्माते, प्रेक्षक हे सगळेच आले. थिएटर मेंटेन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता जर आपल्याकडे थिएटर चांगली नाहीयेत. म्हणजे, कुठे पंखे नाहीत, एसी नाही. साऊंड चांगला नाही. स्वच्छतागृहं नेटकी नाहीत. या सगळ्या अडचणी आहेतच. पण, म्हणून आपण तिथे नाटक करायचं नाही का? तर तसं होता कामा नये. मला वाटतं प्रयोग व्हायलाच हवेत. अशा पद्धतीने एकेक नाट्यगृहात प्रयोग करायचे नाहीत असं आपण ठरवलं तर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था होईल. म्हणजे ज्या नाट्यगृहात हे प्रयोग होणं बंद होईल तिथली दुरवस्था अधिक वाढेल. त्याला कारणीभूत आपणच असू. नाटक.. नाटक जोवर आहे तोवर त्याच्या दोनच गोष्टी शेवटपर्यंत राहणार आहेत. पहिला नाटकाचा लेखक आणि दुसरा हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा आमच्यासारखा कलाकार आणि याची तिसरी बाजू अशी की आम्ही सादर केलेलं नाटक पाहणारा प्रेक्षक. हे तीन घटक जोवर आहेत तोवर नाटकाचे प्रयोग व्हायला हवेत.

बदलत्या काळानुसार नाटकाची गणितं बदलली असली तरी मला आठवतं पूर्वी गावोगावी नाटकाच्या, एकांकिकेच्या, दिर्घांकाच्या स्पर्धा व्हायच्या. या स्पर्धा हा फार महत्वाचा घटक आहे. गावोगावी होणाऱ्या या स्पर्धांमधूनच आज वेगवेगळ्या माध्यामात झळकणारे कलाकार दिसतायत. या स्पर्धा केवळ कलाकार घडवत नव्हत्या. तर त्या त्या ठिकाणचा लेखक, कलाकार आणि प्रेक्षक घडत होता. नाटकासाठीचा नवा प्रेक्षक या स्पर्धांमधूनच तर तयार झाला. या स्पर्धा पुन्हा सुरू व्हायला हव्यात. म्हणजे, आपल्याकडे वारी असते पहा. वर्षातून एकदाच होणारा हा सोहळा आहे. या निमित्ताने राज्यातले लाखो वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात. पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राचं हे कल्चर आहे. उद्या जर ही वारीच बंद केली तर? असे वारकरी तयार होतील का? तसंच या स्पर्धांचं आहे. यातून गावातली थिएटर्स तिथल्या आणि परिसरातल्या रंगकर्मींना अत्यंत माफक दरात उपलब्ध करून द्यायला हवीत. तिथे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होवोत न होवोत.. नाटकाबद्दलचं काम तिथे सुरू राहायला हवं. आज व्यावसायिक नाटकाच्या तिकीटाचा दर 500 रुपये आहे. यात निर्मात्याचीही चूक नाही. नाटकाचा खर्चच इतका वाढला आहे की तेवढे तिकीट दर लावावे लागतात. असं असताना या स्थानिक रंगकर्मींना माफक दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिल्यानं नाटकाचा खर्च कमी होतो यातून त्यांच्या नाटकाच्या तिकीटाचे दर कमी होतील.. मग प्रेक्षक नाटक पाहायला येईल. या पद्धतीने गावोगावच्या कलाकारांना नाट्यगृहं उपलब्ध झाली तर नाटकाची चळवळ होईल. नुसतं नाट्यगृहं बांधून होणार नाही. आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा.

सध्या आपण महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण पाहिलं तर लक्षात येईल की हे गेल्या 20 वर्षातलं सर्वाधिक दूषित वातावरण आहे. म्हणजे ऐकायला जरा अतिशयोक्ती वाटेल, पण आज जर पुलं आणि आचार्य अत्रे असते तर रोज कुणी ना कुणी तरी त्यांच्या तोंडाला काळं फासून गेलं असतं. आणि यात सगळे आहेत हं. म्हणजे, राजकीय पक्ष तर आहेतच. कारण त्यांना आपआपली पॉकेट्स सांभाळायची आहेत. पण शहाणी, सुशिक्षित मंडळीही अशा वादात असमंजसपणे उडी घेतात आणि वातावरण अधिक गढूळ करतात. अशावेळी मराठी कलाकारांना टारगेट करणं सोपं होतं. कारण त्यांच्या पाठीशी कोणी विशिष्ट राजकीय शक्ती नसते, जातीची वा धर्माची संघटना नसते. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांना टारगेट बनवणं वाढतं आहेच की. कोणीही उठतं आणि त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करत सुटतं. बरं.. आम्ही सगळे कलाकार आहोत. आम्ही ना कुणाचं नुकसान केलं आहे.. ना कुणाची चोरी केली आहे.. ना कुणाला फसवलं आहे. आम्ही आपापलं काम करत असतो. तरीही या गोष्टी वारंवार होतात. कारण मुळात नाटक आपल्यापासून दूर गेलं तसे आपण रक्षक नाही तर भक्षक बनलो आहोत.

म्हणजे नाटकांना विरोध पूर्वीपासून होत होता. फार दूर जायची गरज नाही. विजय तेंडुलकरांची गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल ही जी नाटकं आहेत, त्यांना विरोध झालाच की पण त्याचे शेकड्याने प्रयोगही झाले हे आपण विसरतो आहोत. आपल्याकडच्या वैविध्य असणाऱ्या याच गोष्टी आपण घालवून टाकू लागलो आहोत.

मला एक सांगा, नाटक आपल्याला अपील का होतं? कारण नाटक हा समाजाचा आरसा आहे असं आपण म्हणतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं नाटकासारखं दुसरं माध्यम नाही. जे जे तुम्हाला म्हणावं वाटतं त्यासाठी नाटकासारखं दुसरं व्यासपीठ नाही. त्यावर जर तुम्ही सतत बंधनं आणू लागलात तर कसं होणार ? कोणीही कलाकार नाटकाकडे का ओढला जातो? कारण नाटक कोणत्याही कलाकाराला त्याची जात, धर्म विचारत नाही. तू अमूक जातीचा आहेस म्हणून नाटक त्याला अधिक काही देत नाही वा तू अमुक धर्माचा आहेस म्हणून त्याच्याकडून ते काही काढून घेत नाही. नाटक सगळ्यांना सगळं देतं. म्हणून नाटक परमेश्वर आहे. ते कुणावरही अन्याय करत नाही. तुम्ही नाटकाने दिलेल्या संधीचं सोनं कसं करता त्यावर तुमचं काम ठरतं. आज जर राज्यातली एकमेव अभिव्यक्ती असलेली गोष्ट उरली असेल तर ती नाटक आहे. त्याची गळचेपी झाली तर आपल्याकडे सांगकामे तयार होतील. विचारवंत तयार होणार नाहीत. आपल्याला अभ्यासक मिळणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.

आज जागतिक रंगभूमी दिन आहे. तिकडचं नाटक इकडचं नाटक.. त्यांच्याकडून आपण काय घेऊ.. असे प्रश्न बऱ्याचदा येतात. त्यावेळी मला वाटतं कशाला हवं आपल्याला त्यांचं नाटक.. त्यांची जगण्याची पद्धत वेगळी.. त्यांची गरज वेगळी आणि त्यातून आलेलं त्यांचं नाटक वेगळं. त्यांच्याकडून आपण घ्यायची तर शिस्त घेऊ शकतो. प्रेक्षक आणि कलाकार दोघांनीही आपल्याकडे आपलं असं वैशिष्ट्य आहे. भारत म्हणून.. महाराष्ट्र म्हणून आपापाली वैशिष्ट्य आहेत.. ते लक्षात घेऊनच आपल्याकडे नाटकं येणार.. यायला हवीत. तिकडे पाश्चात्य लोकांची कॉपी आपण करूच शकत नाही. आपल्याला आपल्या जगण्याशी अनुसरुनच नाटक केलं पाहिजे.

मी तेच म्हणतोय, आपल्या भारतात हजारो वर्षांपूर्वी खजुराहोसारखी शिल्प कोरली गेली.. जिथे मंदिरांच्या बाहेरच्या भागावर लपूनछपून नव्हे, तर मुक्तपणे संभोगाची चित्रं रेखाटली गेली.. आज त्याच भारतातल्या नाटक नावाच्या प्रकारात अमुक व्यक्तिवर बोलायचं नाही.. तमुक घटनेवर बोलायचं नाही अशी बंधनं लादली जातायत. म्हणजे आपण खरंच पुढारलो आहोत की दोन हजार वर्षामागे आदीम होतो आहोत हा विचार करण्याची गरज आहे.

नाटक हे मोकळं होण्याची गोष्ट आहे. ब्रिदिंग आऊट आहे. नाटक ही माणसाला घडवणारी गोष्ट आहे, शिकवणारी, समृद्ध करणारी गोष्ट आहे. समंजस करणारी गोष्ट आहे. त्या नाटकाला आपण लेबलं लावायला लागलो तर आपल्याकडे फक्त विदुषक तयार होतील. ज्या नाटक कलेनं आपल्याला मोठं केलं. समृद्ध केलं, सुजाण प्रेक्षक घडवले त्याच नाटकाने आता आपल्यावरची लेबलं झुगारून आपल्याला हव्या त्या पद्धतीने मुक्त होण्याची गरज आहे.

अहो, मतमतांतरं कुठं नसतात सांगा. एका घरात राहणाऱ्या बाप-मुलातही मतांतरं असतात. मग समाजातही असणारच. पण नाटक हे माध्यम असं आहे की यातून समाजात एकवाक्यता येण्याची स्थिती वा शक्यता निर्माण होऊ शकते. ही एकवाक्यता येण्यासाठी नाटक आपल्याला प्रवृत्त करतं. विचार करायला लावतं. म्हणूनच आपल्या मनातली खदखद योग्य पद्धतीने बाहेर काढणाऱ्या नाटककाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आज गरज आहे. त्याला साथ द्यायची गरज आहे. ही साथ जोवर मिळणार नाही तोवर समाज घडणार नाही. घडतील ती फक्त गाढवं. काठीनं हुसकावल्यावर घोळक्याने एका दिशेला जाणारी गाढवं. मग माणसं उरणार नाहीत. नाटक आणि माणूस या दोन गोष्टी वेगळ्या काढता येत नाहीत. जोवर नाटक आहे तोवर माणूस आहे. आणि जोवर माणूस आहे तोवर नाटक मरणार नाही.

शब्दांकन - सौमित्र पोटे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : दुसऱ्या दरवाजाने कोरटकर कोर्टात, शिवप्रेमी संतप्त, पायताण देऊन घोषणाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Embed widget