Savlyachi Janu Savali : प्रेक्षकांची लाडकी 'राधा' पहिल्यांदाच खलनायिका होणार, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत वीणा जगतापची महत्त्वाची भूमिका
Savlyachi Janu Savali : 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून राधाच्या भूमिकेतून ती घराघरांत पोहोचली. मात्र, आता ती एक वेगळ्या भू्मिकेतप प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
Savlyachi Janu Savali TV Serial : ‘सावळ्याची जणू सावली’ ही झी मराठीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री वीणा जगताप ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून राधाच्या भूमिकेतून ती घराघरांत पोहोचली. मात्र, आता ती एक वेगळ्या भू्मिकेतप प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप, ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारणार आहे .
वीणा जगताप पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत
पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका करण्याचा निर्णय का घेतला आणि मनात कोणते विचार होते, याबाबत वीणाने सविस्तर चर्चा केली. यावेळी वीणा जगताप म्हणाली, "या मालिकेत मी ऐश्वर्या मेहेंदळेची भूमिका साकारत आहे. ती खूप महत्वाकांक्षी आहे, तिला तिच्या पुढे इतक कोणी गेलेलं आवडत नाही. तिचं लग्न अश्या घरी झाले आहे, जिथे तिच्या सासूबाईंना फक्त सुंदर गोष्टीच आवडतात. ऐश्वर्या मिस पुणे आहे आणि जेव्हा तिलोत्तमा पहिल्यांदा ऐश्वर्याला पाहते, तेव्हा हीच सून हवी असं ठरवते. ऐश्वर्या जरी हाऊसवाईफ असली तरीही ती स्वतः काही काम न करता लोकांनकडून काम करवून घेते. ऐश्वर्या तिलोत्तमाची लाडकी सून आहे."
‘सावळ्याची जणू सावली’मध्ये महत्त्वाची भूमिका
या मालिकेसाठी निवड कशी झाली याबद्दल वीणाने सांगितलं की, "मला जेव्हा या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला, तेव्हा मी हिमाचल प्रदेश मध्ये फिरायला गेले होते. तिथे नेटवर्कही पुरेसं नव्हतं. पण मला तो कॉल आला ‘सावळ्याची जणू सावली’ नावाचा एक शो आहे आणि एक भूमिकेसाठी तुझं ऑडिशन करायचे आहे, भूमिका नकारात्मक आहे तर तुला आवडेल का ऑडिशन द्यायला. माझ्या मनात पहिला विचार आला अरे बापरे! जमेल का आपल्याला, कारण सकारात्मक भूमिकेच्या तुलनेने नकारात्मक भूमिका थोड्या कठीण असतात असं मला वाटतं."
मालिकेसाठी ऑडिशन कसं दिलं?
वीणाने सांगितलं की, "माझ्याकडे ऑडिशनसाठीएक स्क्रिप्ट आली . साडी किंवा सलवार कमीजमध्ये ऑडिशन पाठवायची होती. मी फिरायला गेली होती तर फक्त ट्रॅव्हलिंगसाठीचे कपडे नेले होते. मी ऑडिशन पाठवली, पण त्यांना ती आवडली नाही. पुढे काही असेल तर कळवू, असं त्यांनी सांगितलं. मी ट्रिपवर होते, तर मी तेवढं मनावर नाही घेतलं. सुट्टी वरून आली आणि मला परत कॉल आला की, तू लुक टेस्टसाठी येऊ शकशील का, मी लूक टेस्ट दिली आणि त्याच दिवशी माझी उज्जैनची ट्रेन होती. मी महाकालला जात होते. दुसऱ्या दिवशी मी देव दर्शनासाठी गेली माझं दर्शन झाले आणि मी मंदिरातून बाहेरच पडत होते आणि तेव्हाच मला कॉल आला की तुझी निवड झाली आहे."
'आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायची संधी'
मालिकेसाठी निवड झाल्यावर आनंद झाल्याचं तिने सांगितलं, वीणा म्हणाली, मला प्रचंड आनंद झाला आणि दडपणही तेवढच आलं. माझी आई सोबत होती, ती म्हणाली तुला प्रसाद मिळाला. जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला तेव्हा नकारात्मक भूमिका का करतेय म्हणून मला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण माझं असं आहे की, प्रायोगिक असलं पाहिजे आणि मला ही बघायचे आहे की मी अश्या भूमिकेला न्याय देऊ शकेन का? माझं असं ही मत आहे की मी अजून तितकी मोठी अभिनेत्री झाली नाहीयं. म्हणजे प्रसिद्ध होणं आणि मोठी अभिनेत्री होणं दोन वेगळ्यागोष्टी आहेत. मी पॉप्युलर असू शकते पण ग्रेट अभिनेत्री नाही आणि त्यासाठी मला अश्या आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायची संधी मिळत असेल तर मला त्या करायच्या आहेत. आता आव्हान घेतलं आहे आणि मेहनत करायची तयारी आहे. बघूया प्रेक्षक कशी साथ देतील, असंही वीणा म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :