Sanju Rathod : जगभरात गाजलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं लिहिणारा संजू राठोड आहे तरी कोण? इंजिनीअरिंगचा अभ्यास करताना गवसली संगीताची वाट
Sanju Rathod : गुलाबी साडी हे गाणं लिहिल्यानंतर संजू राठोडचं आयुष्य कसं बदललं याविषयी त्याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
Sanju Rathod : 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. अगदी सामान्यांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींना देखील या गाण्याची भुरळ पडली. इतकच नव्हे तर मराठी फिल्मफेअरच्या मंचावर देखील हे गाणं सादर करण्यात आलं. पण या गाण्यासोबतच एक प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला. तो म्हणजे हे गाणं लिहिणारा संजू राठोड (Sanju Rathod) नेमका आहे तरी कोण? दरम्यान संजूने नुकतची 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या सांगितीक प्रवासाचा उलगडा केला आहे.
गुलाबी साडी या गाण्यामुळे संजूला जगभरात प्रसिद्धी मिळाली. याआधी हे गाणं कसं लिहिलं याबाबत देखील संजूने भाष्य केलं होतं. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा आहे. जसा प्रत्येकाचा प्रवास असतो, तसाच माझाही प्रवास असल्याचं यावेळी संजूने म्हटलं. तसेच इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारा संजूला संगीताचं बाळकडू हे घरातूनच मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे.
पहिलं गाणं कसं लिहिलं?
संजू राठोडने त्याच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, 'माझ्या घरातच माझे वडिल आणि आजोबा भजन करायचे, ते मी रात्र रात्र ऐकत बसायचो. तिथूनच माझ्यात ते आलं असावं. पहिल्या गाणं कसं सुचलं याविषयी बोलताना संजूने म्हटलं की, माझं पहिलं ब्रेकअप झालं तेव्हा मला ते गाणं सूचलं. त्याला काही वेगळं कारण नाही. मी हर्ट झालो होतो, मग मी एक रॅप लिहिला. तेव्हा रॅप करता करता मी शोज देखील केले. त्या शोला मी माझ्या आईवडिलांना बोलवायचो. जळगावांत जे कार्यक्रम व्हायचे तिथे मी त्यांना फोर्स करुन करुन माझा रॅपचा परफॉर्मन्स ठेवायला सांगायचो. असंच एकदा माझे पप्पा आले होते. पप्पांनी तो रॅप ऐकला आणि ते निघूनही गेले. तेव्हा मी त्यांना विचारलं, की तुम्हाला आवडला का रॅप. ते म्हणाले की तू काय लिहिलं आहेस, हेच कळत नाहीये. त्यानंतर मला कळायला लागलं की, आपण असं काहीतरी करावं जे सगळ्यांना आवडेल.'
रितेश देशमुखमुळे पहिलं गाणं ठरलं हिट
कसं लिहिलं पहिलं गाणं? यावर बोलतांना संजूने म्हटलं की, 'माझ्या आईने सांगितलं की, तू काहीतरी देवावर गाणं लिही. मग मी बाप्पावाला गाना हे गाणं लिहिलं. तेही लोकांना इतकं आवडलं. पण रितेश देशमुख सरांनी त्यावर रील केलं आणि ते फेमस झालं. तेव्हापासून मला वाटलं की, आता थांबायचं नाही. माझा एक मित्र आहे, प्रवण लोणकर म्हणून, तोही सिंगर आहे. मी कोणतंही गाणं लिहिलं की मी त्याला पाठवतो. तो मला सांगतो की, अरे यात काहीतरी मिसिंग आहे. यात संजू राठोड कुठेतरी दिसत नाहीये. पण जेव्हा मी त्याला गुलाबी साडी हे गाणं ऐकवलं तेव्हा तो म्हणाला की मला हे गाणं आवडलं. तेव्हा मी त्याला म्हटलं की, तु मस्करी वैगरे करतोय का. तेव्हा तो म्हणाला की नाही रे मला खरंच खूप आवडलं.'
गुलाबी साडीने आयुष्य कसं बदललं?
या गोष्टीने आयुष्य कसं बदललं यावर बोलताना संजूने म्हटलं की, 'की ही खूप वर्षांची मेहनत आहे. सहा ते सात वर्ष त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. माझ्याकडे रेंट भरायला पैसे नव्हते. मी खूप कर्ज काढलं होतं. व्याजाने पैसे घ्यायचो आणि व्हिडिओ बनवायचो. मी युट्युबवरही चुकीचा पत्ता टाकल्याने त्याचे जे पैसे यायचे ते दुसऱ्या ठिकाणी जायचे. माझी दोन वर्ष त्यातच गेलीत. त्यानंतर ते व्यवस्थित झाल्यावर मला 40 ते 50 हजार रुपये येऊ लागले. त्यात काय काय करायचं असा प्रश्न होता. मग माझ्या भावाने म्हणजेच गौरव राठोडने आणि मी सोबत काम करण्यास सुरुवात केली. अगदी शून्यापासून सुरुवात केली, पण आता सगळं व्यवस्थित आहे.'