गनिमी काव्याने रविकांत तुपकर मुंबईत दाखल, कर्जमाफीसाठी मुंबईतच आंदोलन होणार, तुपकरांचा इशारा, समर्थक पोलिसांच्या ताब्यात
Ravikant Tupkar : मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेकडो गाड्या पोलिसांनी थांबविल्या आहेत. रविकांत तुपकरांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Ravikant Tupkar : पुणे येथे 3 मार्च रोजी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, सोयाबीन कापूस भाव फरक, पीक विमा यासह अन्य मागण्या केल्या होत्या. मागण्यांबाबत तुपकरांनी सरकारला 18 मार्चचा अल्टिमेट दिली होता. तोपर्यंत मागण्या मान्य न केल्यास स्व. साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 19 मार्च रोजी कर्जाचा बोजा असलेले शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन, कापूस अरबी समुद्रात बुडू असा इशारा दिला होता. यानुसार गनिमी काव्याने रविकांत तुपकर हे भूमिगत होऊन मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेकडो गाड्या पोलिसांनी थांबविल्या आहेत. रविकांत तुपकरांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, 17 मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकला. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री झोपेतून उठवून पोलिसांकडून जबरदस्तीने धरपकड करण्यात आली. कुटुंबीय व नातेवाईकांनाही त्रास दिला. याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच म्हणत गनिमी पद्धतीने भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत. या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
शेतकरी चळवळीचा आक्रमक तेवढाच आश्वासक चेहरा अशी रविकांत तुपकर यांची राज्यात ओळख आहे. गेल्या 21 वर्षापासून ते शेतकरी चळवळीत काम करत आहेत. शरद जोशींच्या तालमीत घडलेल्या रविकांत तुपकर यांनी तीन मार्च रोजी चळवळीचे केंद्र असलेल्या पुणे येथे संघटनेची पहिली राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या आणि 18 मार्चपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सरकारला या आश्वासनाची आठवण करून देत 18 मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्व. साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 19 मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब टाकणार असल्याचा इशारा दिला. कोणते आंदोलन करणार हे न सांगितल्यामुळे तुपकर तुपकर यांच्या आंदोलनाची चांगलीच उत्सुकता लागली होती. दरम्यान, सरकारने अधिवेशन संपत आले तरी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. यामुळे रविकांत तुपकर व राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आंदोलनाची जोरदार तयारी केली. शिवणी आरमाळ येथे स्व. कैलास नागरे यांना श्रद्धांजली अर्पण करून ते मुंबईकडे रवाना होणार होते. बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास अडीचशे गाड्या तर इतर जिल्ह्यातूनही हजारो शेतकरी मुंबईला जाणार होते.
तुपकरांच्या घर आणि कार्यालयाला पोलिसांचा वेढा
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी शेतकरी चळवळीत आक्रमक आंदोलने केली आहेत. सरकारच्या उरात धडकी भरवणारे आंदोलन त्यांनी मुंबईत केले होते. त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे 17 मार्चच्या रात्रीच रविकांत तुपकर आणि त्यांच्या हजारो शेतकरी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याचा डाव सरकार आणि पोलिसांनी आखला. तुपकरांच्या घर आणि कार्यालयाला छावणी टाकल्या प्रमाणे पोलिसांनी वेढा दिला. अर्ध्यारात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने त्यांना अटक केली. तुपकर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या ताब्यात घेतल्या, गाड्यांचे चालक व मालक देखील ताब्यात घेतले. रविकांत तुपकर यांच्या पत्नी ऍड. शर्वरी यांच्या आई रुग्णालयात उपचार घेत आहेत. मामांचे निधन झाले आहे. या परिस्थितीतील पोलिसांनी त्यांना आईला भेटायला जाऊ दिले नाही. घरीच त्यांना स्थानबद्ध केले. या साऱ्या प्रकाराने शेतकरी चळवळीला धक्का बसला असून कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. इंग्रजांच्या राजवटीपेक्षा जास्त दडपशाही करायला शेतकरी गुन्हेगार किंवा दहशतवादी आहेत का? असा सवाल राज्यभरातील शेतकरी उपस्थित करत आहेत.
गनिमी पद्धतीने पोलिसांना गुंगारा देत रविकांत तुपकर गुप्त मार्गाने मुंबईत दाखल
या साऱ्या परिस्थितीतही घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही शांतता व सनदशीर मार्गाने आंदोलन करणारच म्हणत गनिमी पद्धतीने पोलिसांना गुंगारा देत रविकांत तुपकर गुप्त मार्गाने मुंबईत दाखल झाले आहेत. बुलढाण्यासह राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मिळेल त्या साधनाने मुंबईत पोहचण्याचा प्रयत्न आहेत. या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांचे आंदोलन कोठे आणि कसे होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवणी आरमाळ(देऊळगावराजा) येथील शहीद शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे व भारतातील पहिली शेतकरी आत्महत्या करत शहीद होणारे शेतकरी साहेबराव करपे पाटील यांना अभिवादन करून रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड.शर्वरी तुपकर व सहकाऱ्यांनी अभिवादन करून कर्जमुक्तीच्या आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासना नुसार, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, कापूस व सोयाबीन प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्यावा, कांदा,दूध व धान उत्पादकांना अनुदान द्यावे, ऊसाला एकरकमी एफआरपी, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड, कल्याण रेल्वे मार्गामुळे विस्थापित होत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या पुणे येथील संघटनेच्या बैठकीत केल्या होत्या.
भारतीय संविधानाने आम्हाला लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन अथवा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांनीच दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. खरेतर सरकारने आजही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सोयाबीन आणि कापूस भावातील फरक द्यावा, कांदा- धान अशा सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, दूध उत्पादकांना अनुदान द्यावे. सरकारने आश्वासन दिलेल्या या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही आंदोलन करत नाहीत. परंतु शेतकऱ्यांना द्यायचे काहीच नाही अन आंदोलनही करू द्यायचे नाही. हा कुठला न्याय आणि कायदा आहे? व्हाईट कॉलर गुन्हेगार, गुंड, वाळू आणि भू माफिया मोकाट फिरत आहेत. सरकार आणि पोलीस मात्र शेतकऱ्यांना अटक करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
























