Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' सिनेमाचे पोस्टर रिलीज
Hina Khan : हिना खानचा 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Cannes Film Festival 2022 : आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival) आता सुरुवात झाली आहे. हा फेस्टिवल 28 मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये वेगवेगळे कार्यक्रमदेखील राबवले जात आहे. या फेस्टिवलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. हा फेस्टिवल भारतासाठी खूपच खास आहे. 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या (Hina Khan) आगामी 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' (Country Of The Blind) या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या सिनेमाच्या माध्यमातून हिना खान इंडो-हॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात हिना खान एका अंध मुलीची भूमिका साकारत आहे. रिपोर्टनुसार, हिनाने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. रिपोर्टनुसार, या सिनेमाचे शूटिंग हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये झाले आहे. हा सिनेमा आधी अमेरिकेत प्रदर्शित होणार असून नंतर भारतात प्रदर्शित होणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात भारतीय संघाचे नेतृत्व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. त्यासोबतच आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, शेखर कपूर, प्रसून जोशी आणि इतर दिग्गजदेखील कान्स फिल्म फेस्टिलमध्ये उपस्थित होते.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे.
संबंधित बातम्या