श्रेयस तळपदे आधी 'या' अभिनेत्यांच्या मृत्यूची अफवा, जिवंत असल्याचं द्यावं लागलं होतं स्पष्टीकरण
Celebrity Deaths Rumors Fake News : अभिनेता श्रेयस तळपदे याच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. याआधीही बॉलिवूड कलाकारांना अशा अफवांचा सामना करावा लागला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं, त्यातच कोणत्या न कोणत्या अफवा उडतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबाबतही अनेक अफवा समोर येतात. अलिकडे अभिनेता श्रेयस तळपदे याच्या निधनाची अफवा उडाली होती. सोशल मीडियावर श्रेयसच्या निधनाबाबत चर्चांना पूर आला होता. श्रेयस तळपदेच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाल्यानंतर अखेर त्याला स्वत: जिवंत असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं.
श्रेयस तळपदे आधी 'या' अभिनेत्यांच्या मृत्यूची अफवा
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade Health Update) जिवंत असतानाही त्याच्या मृत्यूची अफवा पसरल्याने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांनाही मोठी धक्का बसला. यानंतर श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट करत अफवांना पूर्णविराम देत नेटकऱ्यांना सुनावलं. श्रेयसने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे.' तसेच, त्याने दिशाभूल करणारी पोस्ट वाचून त्यांच्याशी संपर्क करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी ऐकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बॉलिवूड कलाकारांना अशा अफवांचा सामना करावा लागला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या निधनाची अफवा
शतकातील मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीही पडद्यावर खूप सक्रिय आहेत. त्यांच्या लाईफस्टाईलमुळे लाखो चाहत्यांना प्रेरणा मिळकते. पण, बिग बींच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. 2016 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या निधनाची अफवा पसरली होती. अमिताभ बच्चन यांचा अमेरिकेत एका कार अपघातात मृत्यू झाल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बिग बींनी या अफवांवर मौन पाळलं आणि पडद्यावर त्यांच्या उपस्थितीने अफवांना पूर्णविराम दिला.
ही-मॅनच्या मृत्यूची खोटी बातमी
हिंदी चित्रपटसृष्टीतील ही-मॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबतीत ही अशी खोटी बातमी समोर आली होती. 2022 साली धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी व्हायरल झाली होती. मात्र, त्यांचा मुलगा सनी देओलने या अफवांचे पूर्णपणे खंडन केलं होतं. अभिनेता सनी देओल याने मीडियासमोर येत वडील धर्मेंद्र हयात असून त्यांच्या निधनाची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं होतं.
आयुष्मान खुरानाचं नावही यादीत
मृत्यूची अफवा उडण्याच्या यादीत मल्टीटॅलेंटेड बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचंही नाव आहे. 2013 मध्ये आयुष्मानच्या निधनाची अफवा उडाली होती. सोशल मीडियावर व्हायरल बातम्यांमध्ये दावा करण्यात आला होता की, आयुष्मान खुरानाचं निधन झालं आहे. कुटुंबासह स्वित्झर्लंडला सुट्टीसाठी गेलेल्या आयुष्मान खुरानाचा स्नो बोर्डिंग करताना अपघात होऊन त्याला जागीच आपला जीव गमवावा लागला, अशी खोटी बातमी समोर आली होती.
शक्ती कपूर यांच्या मृत्यूची अफवा
बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांच्या निधनाची बातमी 2015 मध्ये व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती. खंडाळ्याला जात असताना कार अपघातात शक्ती कपूर यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. यावर स्वत: शक्ती कपूर यांनी मौन सोडलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, "मी बँकॉकमध्ये 'क्या कूल हैं हम 3' चे शूटिंग पूर्ण करून नुकताच घरी परतलो होतो. निधनाची बातमी ऐकून मित्र मला फोन करुन रडू लागले. डेव्हिड धवन आणि रुमी जाफरीही काळजीत पडले होते. मी लोकांना खूप समजावून सांगितलं की, मला काहीही झालेलं नाही आणि मी पूर्णपणे ठीक आहे".
शाहरुख खानचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची अफवा
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचंही नाव यामध्ये सामील आहे. 2017 मध्ये शाहरुख खानच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. एका फ्रेंच वेबसाइटने अभिनेता शाहरुख खानचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला होता. एका फ्रेंच वेबसाइटनुसार, शाहरुख खानची मुलगी सुहानाच्या वाढदिवसाच्या काही तासांनंतर, जेट गल्फस्ट्रीम G550 क्रॅश झाले आणि त्याचा मृत्यू झाला. किंग खान बिझनेस मीटिंगसाठी तिथे गेला होता आणि खराब हवामानामुळे परतत असताना त्याचे जेट क्रॅश झाल्याचा दावाही वेबसाइटने केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :