Devendra Fadnavis : उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झाली, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis on Congress : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस गायब झाली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis on Congress : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदासंघातून काँग्रेसने सुरुवातील राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर उत्तर कोल्हापुरात मोठा विरोध होऊ लागला होता. त्यामुळे राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर आली होती. दरम्यान, काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर काँग्रेसने उत्तर कोल्हापूरमधून मधुरिमाराजे यांना तिकीट दिली. मधुरिमा राजे यांनी अर्ज देखील भरला होता. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कोल्हापुरात मोठा धक्का बसलाय.
उत्तर कोल्हापूरमधील सर्व प्रकार आश्चर्यकारक आहे - देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "खरं म्हणजे उत्तर कोल्हापूरमधील सर्व प्रकार आश्चर्यकारक आहे. मात्र तिथे जे काही घडामोडी घडल्या, त्यामधून एक गोष्ट लक्षात आली आहे की, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झाली आहे. हे निश्चितपणे पाहायला मिळत आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा राजेश लाटकर यांना पाठिंबा
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. दरम्यान, मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. "तुम्ही माझी फसवणूक केली. दम नव्हता तर लढायचं नव्हतं", असं सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, आता कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर असा सामना पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राजेश क्षीरसागर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ते मैदानात असणार आहेत.
मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर शाहू महाराज काय म्हणाले?
मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी यानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शाहू महाराज म्हणाले , "नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही."
इतर महत्त्वाच्या बातम्या