Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Temple Management Course : हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात तीन महिन्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Mumbai University : मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम (Temple Management Course) सुरु केले जात आहेत. मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या (Hindu Adhyasan Kendra) पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात 6 महिन्यांचे प्रमाणपत्र आणि 12 महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.
जून 2024 पासून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार
मंदिर व्यवस्थापन या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे आणि तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वित्त व्यवहार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण व परिसरपूरक अशा अनुषंगिक विषंयावर या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात 3 महिन्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठात नव्याने सुरु होत असलेल्या या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची ओळख होईल त्याचबरोबर एका नवीन रोजगाराच्या संधीचे दालन खुले होऊ शकेल असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच या अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबविण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजमीतीस देशातल्या अनेक मंदिरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून सौर ऊर्जा निर्मिती, दानवस्तूंचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी आणि रांगांचे व्यवस्थापन अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रातही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असून प्रशिक्षित तरूणांना रोजगार मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-1 विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विद्यापीठास आता युजीसीच्या परवानगी सुलभतेसह नवीन अभ्यासक्रम, नवीन विभाग, नवीन कँपसेस, नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतील.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI