Mumbai University : मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी 20 कोटीचे अनुदान मंजूर
PM USHA : पीएम-उषा अंतर्गत मंजूर 20 कोटी अनुदानामुळे कलिना आणि ठाणे उपपरिसराच्या बळकटीकरणास हातभार लागणार असून पायाभूत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सुविधांमध्ये होणार वाढ होणार आहे.
मुंबई: प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM USHA) अंतर्गत मुंबई विद्यापीठास (Mumbai University) पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी 20 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करून पायाभूत सुविंधाचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पी-एम उषा अंतर्गत देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाचे डिजिटल लाँचिंग केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मंजूर झालेल्या 20 कोटीच्या अनुदानाअंतर्गत कलिना संकुल आणि ठाणे उपपरिसरासह स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड अप्लाईड सायन्सेस कल्याण येथे विविध योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. यामध्ये कलिना संकुलात मुलींचे नवीन वसतिगृह, ठाणे उपपरिसरात व्हॉली बॉल ग्राऊंड, टेनिस ग्राऊंड, सोलार पॉवर जनरेशन सिस्टिम, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार आणि सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कलिना संकुलातील इन्क्युबेशन सेंटरचे आधुनिकीकरण, कृत्रिम बुद्धीमत्ता अनुषंगिक आरोग्य क्षेत्रातील विशेष कार्य, हार्ड ड्राईव्ह फॉरेन्सिक डुप्लिकेटर, फॉरेन्सिक एनालाईझर सॉफ्टवेअर, मोबाईल फॉरेन्सिक टूल सॉफ्टवेअर, भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत पाली भाषेतील विविध अभ्यासक्रम, एबिलीटी एनहान्समेंट कोर्स अशा अनुषंगिक बाबींसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM USHA) या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीमुळे कलिना संकुलासह ठाणे उपपरिसर व स्कूल ऑफ इंजिनीअरींग अँड अप्लाईड सायन्सेस कल्याण येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ व शैक्षणिक बळकटीकरणास मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आरोग्यविषयक सेवा आणि मशीन लर्गिंग या उद्योन्मुख क्षेत्रांवरही विशेष भर दिला जाणार असल्याचेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
पीएम-उषा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजना याचे डिजिटल लाँचिंग मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली असून विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आणि पीएम-उषा सेलच्या समन्वयिका प्रा. वर्षा केळकर माने यांनी केले आहे.
ही बातमी वाचा: