सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Sangli Shivsena : सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. शिवसेनेतील फुटींनंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख श्री ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला संजयबापू विभूते यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक सन 2002 पासून शिवसेनेत सक्रिय झाला. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तंत्राप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत संघर्षातून दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली. सुरवातीच्या काळात शिवसेना शाखाप्रमुख नेवरी येथून सुरुवात केली. विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख त्यानंतर पुढे खानापूर तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने मानून खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांचे नेटवर्क तयार केले. मनमिळावू स्वभाव, उत्कृष्ट संघटन कौशल्य, आक्रमक वक्तृत्वशैली, निर्भिड स्वभाव आणि धाडसी वृत्ती या गुणांच्या कौशल्यावर शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर लक्षवेधी आणि आक्रमक आंदोलने करून त्यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आक्रमक व धाडसी नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून एक सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख ते थेट जिल्हाप्रमुख असा राजकीय प्रवास नेवरीसारख्या एका खेड्यातील संजयबापूंसारख्या नेत्याने केला आहे. कायमस्वरुपी दुष्काळी भागाला शेतकर्यांच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे यासह शेतकर्यांच्या अनेक प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून संजयबापूंनी आजवर अनेक लक्षवेधी आंदोलने केलेली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























