धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
सृष्टीने अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अंधेरी पोलिसांना सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली
मुंबई : राजधानी मुंबईत अनेकजण स्वप्नांचा पाठलाग करत येतात, काहींची स्वप्नपूर्ती होते, तर काहींना स्वप्नांच्या वाटेवरच फेऱ्या घालाव्या लागतात. त्यामुळेच, मुंबईला (Mumbai) मायानगरी असेही म्हणतात. याच मायानगरी मुंबईत गुन्हेगारी अन् गुन्ह्याशी संबंधित अनेक घटना घडत असतात. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 25 वर्षीय सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून (Hospital) माहिती मिळाल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
सृष्टीने अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अंधेरी पोलिसांना सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर महिलेचं पार्थित घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलं आहे. "Asphyxia due to hanging (unnatural)" म्हणजेच युवतीचा दम घुटल्याने तिचा मृत्यू झाला, फाशी घेऊन तिने आत्महत्या केल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, मृत युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, नातेवाईकांचे जबाब नोंदवले असता सृष्टीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर, पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी युवकाचे नाव आदित्य पंडित असून तो 27 वर्षीय आहे. त्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.