मोठी बातमी! नागपूरमध्ये दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण!
नागपुरात दगडफेक झाली आहे. या दगडफेकीमुळे नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Ngpur Clash and Riots : नागपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेमुळे सध्या नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे या दगडफेकीमुळे नागपुरातील शिवाजी चौकाला छावणीचं स्वरुप आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जमावाने काही गाड्यांना आगदेखील लावली आहे. पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर केला जात आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले.
दगडफेकीमुळे गाड्यांचेही नुकसान
मात्र चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाल्याची माहिती आहे.
क्रेनला आग, गदडफेक
मिळालेल्या माहितीनुसार जमावाने एका क्रेनलाही आग लावली आहे. पोलिसांच्या दिशेने दगड आणि विटा भिरकावल्या जात आहेत. मात्र पोलीस जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन
या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

