Badlapur : महाभयंकर! नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी, शाळेच्या कारनाम्याचा कहर
Badlapur Crime : चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची तक्रार द्यायला गेलेल्या पालकांना पोलिसांनी 12 तास ताटकळत ठेवल्याचं समोर आलं आहे.
ठाणे : बदलापूरमधील दोन चिमुरडींवरील अत्याचाराने आज देशभर संतापाची लाट उसळली आहे. एका नामांकित शाळेतील सफाई कामगाराने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरोपी अक्षय शिंदे याच्यावर या चिमुकल्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली आणि घात झाला. आरोपीचं वागणं संशयास्पद होतं, अशाही परिस्थितीत शाळेने या आरोपीवर जबाबदारी देत नालायकपणाचा कहर केल्याची टीका होत आहे.
Badlapur School Girls Sexually Abused : नेमकी घटना काय?
1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं.
घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं. ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं.
पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
शाळेचा बेजबाबदारपणा, हैवानालाच कामावर ठेवलं
बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली.
बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही.
ही बातमी वाचा: