Mutual Fund Rules : 1 एप्रिलपासून म्युच्युअल फंडच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल, गुंतवणुकीवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Mutual Fund Rules : सेबीने म्युच्युअल फंडांशी संबंधित काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिल 2015 पासून लागू होणार आहेत.

Mutual Fund Rules : भांडवल बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडांशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs) नवीन निधी ऑफर (NFO) द्वारे उभारलेला निधी विहित कालावधीत गुंतवावा लागेल. शिवाय, गुंतवणूकदारांना योजनेची आर्थिक स्थिरता चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठी सेबीने म्युच्युअल फंड योजनांना 'स्ट्रेस टेस्टिंग' प्रकटीकरण करणे अनिवार्य केले आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2015 पासून लागू होणार आहेत. म्युच्युअल फंडांचे कामकाज अधिक चांगले बनवणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करणे, हे या मागील उद्दिष्ट आहे.
1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (एएमसी) आता न्यू फंड ऑफर (NFO) द्वारे उभारलेले पैसे 30 दिवसांच्या आत गुंतवावे लागतील. पूर्वी ही वेळ मर्यादा 60 दिवसांची होती, जी आता 30 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. जर एएमसी निर्धारित वेळेत निधी गुंतवू शकला नाही, तर गुंतवणूकदारांना कोणत्याही एक्झिट लोडशिवाय त्यांचे पैसे काढण्याची परवानगी असेल. या नियमाचा उद्देश एएमसींना जास्त निधी उभारण्यापासून रोखणे आणि निधीची योग्य गुंतवणूक सुनिश्चित करणे आहे.
स्ट्रेस टेस्टचे निकाल जाहीर करावे लागणार
म्युच्युअल फंड योजनांना आता त्यांच्या स्ट्रेस टेस्टचे निकाल जाहीर करावे लागणार आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना योजनेची आर्थिक स्थिरता चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. एएमसी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग म्युच्युअल फंडात गुंतवला जाईल. सेबीने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या (AMC) कर्मचाऱ्यांचे कामकाज सोपे करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराचा एक विशिष्ट भाग म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणे बंधनकारक असणार आहे. ही गुंतवणूक कर्मचाऱ्याच्या पदावर आणि जबाबदारीवर आधारित ठरवली जाईल. सेबीने घालून दिलेल्या नियमांनुसार ती अंमलात आणली जाणार आहे.
गुंतवणुकीवर कसा परिणाम होणार?
- 30 दिवसांच्या कालावधीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे लवकर गुंतवले जातील याची खात्री होईल, ज्यामुळे भांडवल निष्क्रिय राहण्याचा धोका कमी होईल.
- जर एएमसी निर्धारित वेळेत निधी गुंतवू शकला नाही, तर गुंतवणूकदार एक्झिट लोडशिवाय त्यांचे पैसे काढू शकतात.
- जास्त निधी संकलन आणि चुकीची गुंतवणूक रोखण्यासाठी सेबीने एएमसींकडून उभारता येणाऱ्या निधीच्या रकमेवर मर्यादा घातल्या आहेत.
- यामुळे गुंतवणूकदारांना विश्वास मिळेल की त्यांचे पैसे योग्य वेळी आणि योग्य मूल्यांकनावर गुंतवले जातील.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
