(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परकीय चलनसाठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट, तिजोरीत नेमका किती परकीय साठा?
Foreign currency reserves: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परकीय चलन साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. परकीय चलन साठा 1.132 अब्ज डॉलरने कमी झाला आहे.
Foreign currency reserves: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलन साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 1.132 अब्ज डॉलरने कमी होऊन 616.097 अब्ज डॉलर झाला आहे. जो मागील आठवड्यात 617.23 अब्ज डॉलर होता.
बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परकीय चलन राखीव डेटा जारी केला आहे. आकडेवारीनुसार, 16 फेब्रुवारी अखेर परकीय चलनाचा साठा 616.097 अब्ज डॉलर इतका कमी झाला आहे, जो गेल्या आठवड्यात 617.23 अब्ज डॉलर होता. परकीय चलन संपत्तीतही घसरण दिसून आली आहे. विदेशी चलन संपत्ती 740 दशलक्ष डॉलरने घसरून 545.78 अब्ज डॉलर झाली आहे.
सोन्याच्या साठ्यातही घट
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या (RBI) सोन्याच्या साठ्यातही घट झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा 362 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 47.37 अब्ज डॉलर झाला आहे. SDR देखील 28 दशलक्ष डॉलरने कमी झाला आहे. तो 18.10 अब्ज डॉलरवर आला आहे. IMF मधील ठेवींच्या साठ्यात किंचित घट झाली आहे. ती 1 दशलक्ष डॉलर्सनी कमी होऊन 4.83 अब्ज डॉलरवर आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये परकीय चलनाचा साठा 645 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. मात्र रशिया आणि युक्रेननंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. आज (23 फेब्रुवारी) चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी दिसून आली आहे. एका डॉलरच्या तुलनेत 8 पैशांच्या घसरणीसह रुपयाने 82.94 चा स्तर गाठला आहे, जो गेल्या सत्रात 82.86 रुपये होता.
दरम्यान, जेव्हा जेव्हा RBI देशांतर्गत चलन स्थिर करण्यासाठी चलन बाजारात हस्तक्षेप करते, तेव्हा विदेशी चलन मालमत्तेत वाढ किंवा घट होते, ज्यामुळे RBI च्या परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. पतधोरण जाहीर करताना, आरबीआय गव्हर्नर म्हणाले होते की भारताला बाह्य वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
परकीय चलनसाठ्यामुळे परकीय व्यापाराला चालना
परकीय चलन साठ्यामुळे परकीय व्यापाराला चालना मिळते. तसेच ज्या देशाचा परकीय चलन साठा जास्त असतो त्या देशाचा अर्थव्यवस्था देखील सक्षम असते. त्यामुळे परकीय चलन साठा हा आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील महत्त्वाची भूमिका निभावतं. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये वाढ करण्यासाठी भारत सरकराकडून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये आत्मनिर्भर भारत, निर्यात मालावर शुल्क किंवा कर माफी (Remission of Duty or Taxes on Export Product – RoDTEP), शुल्क सूट योजना (Duty Exemption Scheme) यांसारख्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या: