(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2022 : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात; फक्त इतक्याच प्रतींची छपाई
Budget 2022 Date : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात सादर होणार असून फक्त औपचारिकता म्हणून केवळ 100 प्रतींची छपाई करण्यात येणार आहे.
Budget 2022 Date : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (union budget) सादर केला जाणार आहे. परंतु, मोदी सरकारचं यंदाच बजेटही डिजिटल स्वरुपात असणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत माहिती दिली आहे. देशभरात पसरलेल्या साथीच्या आजारामुळे, आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे कर प्रस्ताव आणि आर्थिक स्टेटमेंट्सच्या सादरीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं छापली जाणार नाहीत, म्हणजेच यावेळीही भारतीयांना बजेट फक्त डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
छपाई नॉर्थ ब्लॉकमध्ये होते
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बजेटची कागदपत्रं बहुतांशी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील. फक्त काही प्रती प्रत्यक्ष उपलब्ध असतील. बजेट दस्तऐवजाच्या शंभर प्रती छापल्या गेल्या आहेत. ही संख्यात्मकदृष्ट्या इतकी विस्तृत प्रक्रिया होती की, छपाई कर्मचार्यांनाही किमान काही आठवडे नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागत होते. अर्थ मंत्रालयाचे कार्यालय नॉर्थ ब्लॉकमध्येच आहे.
हलवा समारंभाने बजेट छपाईची सुरुवात
कर्मचाऱ्यांनी कुटुंबापासून वेगळं राहणं आणि बजेट दस्तऐवजाची छपाई करण्याचं काम पारंपारिक 'हलवा समारंभानं' सुरू करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात.
मोदी सरकारनं बजेटच्या प्रती छापण्याचं प्रमाण कमी केलं
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई मंदावली आहे. सुरुवातीला, पत्रकार आणि बाह्य विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रती कमी केल्या गेल्या आणि नंतर महामारीचा हवाला देत लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना देण्यात येणाऱ्या प्रती कमी करण्यात आल्या.
हलवा समारंभही रद्द
यावर्षी, कोविड-19 चा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनमुळे अधिक निर्बंध लादण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या आजारामुळे पारंपारिक हलवा समारंभही रद्द करण्यात आला आहे.
बजेट दस्तऐवज काय आहे?
अर्थसंकल्पीय दस्तऐवजात सामान्यतः अर्थमंत्र्यांचे संसदेतील भाषण, मुख्य नोट्स, वार्षिक वित्तीय विवरण, कर प्रस्ताव असलेले वित्त विधेयक, वित्तीय विधेयकातील तरतुदी स्पष्ट करणारे मेमोरँडम आणि मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क तपशील असतात. यामध्ये मध्यम मुदतीच्या वित्तीय धोरणासह वित्तीय धोरण, धोरण विवरण, योजनांसाठी परिणाम फ्रेमवर्क, सीमाशुल्क अधिसूचना, मागील अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी, प्राप्ती बजेट, खर्चाचे अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Budget 2022: बजेटपूर्वी मांडण्यात येणारा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो का महत्वाचा असतो?
- Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा?
- Budget 2022: बजेट बनवणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या टीममध्ये आहे तरी कोण-कोण? जाणून घ्या
- Budget 2022: बजेटची सुरुवात कशी झाली? त्यात काय-काय बदल झाले? जाणून घ्या बजेटविषयी या 17 रंजक गोष्टी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा