Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Santosh Deshmukh Case : सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी अवादा कंपनीच्या आवारात आले, तेव्हा तिथल्या टपरीवर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षीदर्शीचा जबाब आता समोर आला आहे.

Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case) आता 100 दिवस उलटून गेलेत. मात्र हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता ज्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी अवादा कंपनीच्या आवारात आले, तेव्हा तिथल्या टपरीवर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षीदर्शीचा जबाब समोर आला आहे. या प्रत्यक्षदर्शीने 6 डिसेंबरला अवादा कंपनीबाहेर नेमकं काय घडलं? याबाबत जबाबात सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे वाल्मिक कराड गँगचा पाय आणखी खोलात गेलाय.
प्रत्यक्षदर्शीने म्हटलंय की, मी 6 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या गेटवरील सोनवणे यांच्या चहाच्या टपरीवर चहा घेत होतो. काही वेळाने तेथे एक काळ्या रंगाची एमएच-44 झेड-9333 या क्रमांकाची स्कार्पीओ तेथे आली. स्कॉर्पीओमधून सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे आणि एक अनोळखी व्यक्ती खाली उतरले.
सुदर्शन घुलेची सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत
यानंतर ते कंपनीचे सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे, अमरदिप सोनवणे व भैय्यासाहेब सोनवणे यांच्यासोबत भांडण करत होते. त्यामुळे मी तिथे गेलो. यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार गेटमधून आत सोडा, असे म्हणत सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घलत होते. सुरक्षा रक्षक त्यांना आत सोडत नसल्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली.
सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही
सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी स्वतःच कंपनीचे गेट उघडले व आतमध्ये गेले. काही वेळाने मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करु नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली. तेव्हा सुदर्शन घुलेने सरपंच संतोष देशमुख यांना म्हटले की, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली. यानंतर केज पोलीस ठाण्यातील पोलीस तेथे दाखल झाले आणि सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना पकडून घेऊन गेले, असे प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























