BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Eid-Ul-Fitr 2025 : बासी ईदच्या दिवशी मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, ॲन्टॉप हिल या भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

मुंबई: देशभरात सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार असून मंगळवारी बासी ईद साजरी केली जाते. या दिवशी मुंबईतील विविध भागांत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे.
ईदच्या दिवशी मुंबईभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तर बासी ईदच्या दिवशी मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, ॲन्टॉप हिल या भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यादरम्यान, नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्टकडून अतिरिक्त बससेवा पुरवण्यात येणार आहे.
सौदी अरेबियामध्ये चंद्राचं दर्शन, भारतात ईद 31 मार्च रोजी
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसला आहे. सौदी अरेबियाने याची अधिकृत घोषणा केली आहे. सौदी अरबमध्ये 30 मार्च (रविवार) रोजी येथे ईदची नमाज अदा करण्यात येणार असून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. सौदी अरेबियात चंद्रदर्शन झाल्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. वास्तविक, सौदी अरेबियानंतर एक दिवस म्हणजे 31 मार्च रोजी भारतात ईद साजरी केली जाईल.
देशभरातील बाजारपेठांमध्ये उलाढाली
रमजान संपल्यानंतर, दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात, ईदगाहवर नमाज अदा केली जाते आणि गोड पदार्थांसह विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.
ईद-उल-फित्रमुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये उत्साह वाढला आहे. बेकरी, कन्फेक्शनरी, रेडिमेड कपडे आणि क्रोकरीच्या दुकानांवर लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
ईदच्या दिवशी, महिनाभर उपवास केल्यानंतर लोक नेहमीप्रमाणा खाणे-पिणे सुरू करतात. या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते. वडीलधारे लोक लहान मुलांना ईदी देतात आणि लोक एकमेकांच्या घरी भेटायला जातात. दिल्ली-मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये ईद-उल-फित्रचा सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.
ही बातमी वाचा:


















