एक्स्प्लोर
BLOG | का घाबरशी, कोरोनाशी!
स्पष्टपणे सांगायचे झाल्यास किटाणूंच्या प्रभावाची आपल्या देशाला फार गरज आहे. किटाणू हा हिंदी भाषेतील शब्द असून जिवाणू व विषाणू ह्या दोघांसाठी ही संज्ञा वापरण्याचे चातुर्य त्यांनी पूर्वीच दाखवले आहे. (हे लिखाण केवळ साक्षरांसाठी लिहिले असून ते सुशिक्षित असल्याने विचारवंत असतात हे गृहीत धरले आहे.)
किटाणूंची गरज आपल्या देशाला असण्याचे कारण म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. दीर्घायुष्याची आपल्याला साथ आहे. आरोग्यसेवा समाधानकारक असल्याने आजारांवर नियंत्रण आहे. हे असूनही आपले जे पंचेंद्रिय आहेत ते स्वतःच अतिशय आरोग्यसंपन्न आहेत. या आरोग्यसंपन्नतेबाबत विस्ताराने सांगायचे झाले तर संत तांबुलनाथ म्हणतात त्याप्रमाणे, आपला जन्म या देशात झालाय हे एकदा कळाले की आपला मेंदू त्या क्षणानंतर सुन्न व बधिर होऊन जातो. यामुळेच आपल्याला सहसा मेंदूविकार होत नाहीत.
लहानपणापासूनच आपण धुळभरल्या रस्त्यावर फिरत असल्याने आपल्या फुफ्फुसात एक दीड किलो धूळ तळाशी पडून असते, त्यामुळे सहसा आपल्याला ठसका, खोकला आणि फार झाले तर दमा ह्या रोगांपलीकडे कोणताही फुफ्फुसविकार होत नसतो. आपले हृदय तर सदैव कित्येकजणींवर एकतर्फी प्रेम करून बहुनिष्ठ झालेले असते. त्यामुळे काळजाला चरे न पडता काळजात घरे होण्याचेच प्रमाण जास्त असते. ह्या कारणाने हृदयविकाराची भीतीही कमीच असते.
आपले लिव्हर व किडनी तर आयुष्यभर दूषित पाणी फिल्टर करून, ड्रेनेज वॉटर पचवून पचवून निव्वळ डॅमेजप्रूफ असते. ठणठणीत पंचेंद्रिय बाळगत सारे भारतीय कुठेही फिरत असल्याने त्यांच्या आजाराने कोणालाही मृत्यू येण्याची शक्यता तशी शून्याईतपत म्हणावी लागते. अश्या परिस्थितीत एखाद्याचे निधन का झाले हे सांगण्यासाठी जे कारण शोधावे लागते ते कारण हे जिवाणू, विषाणू शोधून देतात. ते बिचारे निमित्तमात्र असतात. निमित्तकारक ठरणारे आणि ऋतुमानाप्रमाणे फुलणारे हे चिमुकले जीव जिवलग असले तरी ते जीवघेणे ठरवले जातात. खरेतर त्यांचे आपल्या व स्वतःच्या जीवावर प्रेम असते. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगा असे संत महात्मे जे म्हणून गेले त्यात हे जिवाणू, जिवाणूंमुळे होणारे रोग, ह्यासाठी जगा असा तो विचार होता काय?, हे शोधण्याचे कार्य साऱ्या संत साहित्य संशोधकांनी हाती घेतले पाहिजे.
coronavirus | कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम; सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ
सर्दी, खोकला, ताप, जुलाब, अंगदुखी, कावीळ आणि उलट्यांचा आनंद देणारे, मुदतीचे आजार आणणारे हे जिवाणू, विषाणू, त्यांचा सहकारी डास तथा त्यांचा पाठीराखा ढेकूण ह्यांच्याबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे कारण ते खरे जिवलग असून ते नाराज झाले तर सोबत जीव घेऊन जातात, हे मान्य करावेच लागते. अतिशय चिमुकले असणारे जिवाणू आणि विषाणू हे साध्या डोळ्यांना न दिसण्याइतके बारीक असतात म्हणे. ते आपल्या शरीरात कुठूनही, केव्हाही, कसेही घुसू शकतात हे आपले फार मोठे दुर्दैव आहे.
खरेतर आपल्या देशातही कोणीही, कुठूनही, कसेही राजरोस घुसत असते, देशातील ह्या भागावर माझाच अधिकार आहे, असे सांगते. तेव्हा मात्र आपण देश संपवत असूनही त्याचे स्वागत करतो. मात्र, शरीराच्या बाबतीत मात्र थोडी अधिकच बोंब करतो. देह संपणे चालत नसते. मात्र देश संपणे का चालते ह्याचे गूढ तर साक्षात साऱ्याच किटाणूंना पडलेले असते. दुसऱ्या अश्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे जिवाणू व विषाणू म्हणजे परोपजीवी असतात आणि त्यांचा परजीव म्हणजे आपण असतो. अजूनच सोप्या भाषेत हे म्हणजे हपापाचा माल गपापा असे म्हणता येते.
ह्यांच्याबाबत अचूक भुलवणाऱ्या जाहिराती करून हिंदी, मराठी जाहिरातवाल्यांनी हे किटाणू असूनही त्यांच्याकडूनच फायदा उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. हिवाळ्यात व पावसाळ्यात किटाणूंच्या आगमनाच्या जाहिराती साऱ्या भारतात करून गावोगाव ते आपली उत्पादने घरोघर पोचवतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या घरात जिवाणू, विषाणू येवोत न येवोत, त्याला मात्र ही खात्री असते की सर्दी व्हिक्सने जाते, खोकला ग्लायकोडीनने जातो, ताप क्रोसीनने पळतो, डोकेदुखी सरिडॉनने थांबते. ह्या किटाणूंना दूर पळवत आरोग्याचे रक्षण केवळ लाईफबॉय करते. ह्या उपयोजनेसमोर तर गावोगावचे तज्ञ डॉकटर म्हणजे केवळ चिल्लर ठरतात.
"जिवाणू जीव लावती, विषाणू विष कालवती," असे जरी वाटले तरी व्यक्तिगत स्वच्छता पाळणाऱ्याच्या दारात हे किटाणू फिरकत नाहीत म्हणे. सामूहिक स्वछतेबाबत तर राष्ट्रीय थुंकॊ अभियान पाळत जगणारे करोडो भारतीय बघून खुद्द कोरोनाला त्याचे दोस्त विषाणू इंडियासे डरोना हा सल्ला देत आहेत म्हणे!
नांदेड येथील साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांचे चिरंजीव रविंद्र तांबोळी हे नव्या पिढीतील लेखक म्हणून ओळखले जात आहेत. खास करून मानवी स्वभावातील, बेरकीपणा, उपहास, नर्म विनोदी शैलीत पकडणे हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहेत. अनेक वृत्तपत्र आणि दिवाळी अंकात ते नियमित आपली वेगळी शैली जपत लिहित असतात. मराठवाड्यात काही काळ वास्तव्य केल्यानंतर सध्या पुण्यात नोकरीनिमित्त त्यांचे वास्तव्य आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement