Satara : साताऱ्यातील तापोळा, बामणोली भागात लाखोंनी वटवाघळं; ग्रामस्थ हैराण तर प्रशासनाचं दुर्लक्ष
Satara Bat News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील ग्रामस्थांना वटवाघळांचा त्रास होत असून त्याचा परिणाम या भागातील पर्यटनावर होत असल्याचं चित्र आहे.

सातारा : पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तापोळा आणि बामणोली, पावशेवाडी भागामधील लोकांना आता वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरालगत असणाऱ्या झाडांसह संपूर्ण गावात वटवाघुळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच यामुळे दुर्गंधी पसरत आहे आणि गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील ग्रामस्थांना वटवाघळांचा नाहक त्रास होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे वटवाघुळांचा बंदोबस्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी करणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
तापोळा आरोग्य विभागाचे केंद्र देखील या भागात आहे. त्यामुळे प्रत्येक झाडांवर वटवाघळांची संख्या वाढली असल्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून या वटवाघळांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. गेल्या दोन चार वर्षामध्ये तापोळा परिसरातील वटवाघळांची संख्या ही लाखोंच्या घरात गेल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. ग्रामस्थांनी काही तात्पुरते प्रयत्न केले पण त्यामध्ये यश आलं नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. पण प्रशासनाने त्याला कोणतीही दाद दिली नाही. सगळं प्रशासन या ठिकाणी असतानाही कोणीही दखल घेत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
पर्यटनावर मोठा परिणाम
वटवाघळांमुळे प्राण्यांच्या अंगावर गोचडी होते आणि माणसालाही त्याचा त्रास होतो. गावाच्या परिसरात आजूबाजूला वटवाघळांची विष्ठा पडलेली असते. त्याचा दुर्गंध मोठ्या प्रमाणावर येतो. त्यमुळे पर्यटक या ठिकाणी जराही थांबत नाहीत. वटवाघळामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे याचा ताबोडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर प्रशासनाला आदेश दिले तर त्यावर योग्य ती उपाययोजना होऊ शकते अशी ग्रामस्थांना आशा आहे.
ही बातमी वाचा:


















