Kunal Kamra Apologise: कुणाल कामरा भलताच तरबेज निघाला, माफी मागितली पण...; शिवसैनिकांच्या जखमेवर चोळलं मीठ
Kunal Kamra Apologise: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं तयार करणारा, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला आहे. यामुळे त्याचे प्रेक्षकही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Kunal Kamra Apologise: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Deputy CM Eknath Shinde) विडंबनात्मक गाणं तयार करणारा स्टँडअप कॉमेडियन (Stand-Up Comedian) कुणाल कामरा (Kunal Kamra) सध्या चर्चेत आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) समन्सवर समन्स धाडली जात आहेत. पण, कुणाल कामरा काही चौकशीसाठी हजर राहण्याचं नाव घेत नाहीये. पोलीस कुणालचा शोधही घेत आहेत. पण, कुणाल सध्या कुठे आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरी, कुणाल कामरा सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरुन कुणाल अनेक पोस्ट करत आहे. अशाच एका पोस्टमध्ये कुणालनं जाहीर माफी मागितल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरचं कुणालनं गायलेलं गाणं व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी कुणाल कामराला माफी मागण्यासाठी अल्टिमेटमही दिलं होतं. पण, कुणालनं काही माफी मागितली नव्हती. अचानक त्याच्या अकाउंटवरुन केलेल्या माफीच्या पोस्टमुळे चाहते गोंधळात पडले आहेत. पण, हा गोंधळ संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर लगेच दूर होतो. कुणालनं नेमकी कुणाची आणि का माफी मागितली? सविस्तर जाणून घेऊयात...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं तयार करणारा, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला आहे. यामुळे त्याचे प्रेक्षकही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांनी कामराच्या प्रेक्षकांना कलम 179 अंतर्गत नोटीस बजावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये मुंबईतील एका बँकरचाही समावेश होता. हा बँकर व्हेकेशनसाठी राज्याबाहेर होता. पण, पोलिसांचं समन्स मिळताच, बँकर तातडीनं ट्रिप सोडून मुंबईत परतला.

कुणालचं माफी मागणारं ट्वीट नेमकं काय?
वादात अडकलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं बुधवारी एक नवं ट्वीट केलं. कुणालनं ट्वीटमध्ये लिहिलंय की, "माझा शो अटेंड केल्यानंतर तुम्हाला झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल मी माफी मागतो. कृपया मला मेल करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी व्हेकेशन प्लॅन करू शकेल. देशभरात तुम्हाला जिथे कुठेही फिरायचं असेल तिथे..."
प्रकरण नेमकं काय?
कुणाल कामरानं त्याच्या अलिकडच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये काही वक्तव्य केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. कुणालच्या शो दरम्यान उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांनी अलिकडेच नोटीस बजावली आहे. कुणालच्या प्रेक्षकांमध्ये मुंबईचा एक बँकरही होता. हा बँकर अलिकडेच तामिळनाडू आणि केरळला फिरायला जाणार होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली तेव्हा, त्याला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी मुंबईला परतावं लागलं होतं. आता कुणाल कामरानं त्याच्या ट्वीटमध्ये त्याच बँकरची माफी मागितली आहे आणि त्याच्या ट्रीपचं आयोजन करण्याबद्दल बोललं आहे.
पोलिसांकडून कुणाल कामराला तिसरं समन्स
स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराला महाराष्ट्र पोलिसांनी तिसरं समन्स धाडलं आहे. पोलिसांनी कामराला पाच एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षांच्या कुणाल कामराला खार पोलीस स्थानकात चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलं आहे. यापूर्वी पोलिसांनी कुणालला दोनदा समन्स धाडलं होतं. पण, कुणाल चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही.























