BLOG | बाप्पा निघाले गावाला..चैन पडेना आम्हाला..
वर्षभरापूर्वी ज्याला आपण 'लवकर या', असं साकडं घातलं तो बाप्पा घरातील मखरात काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवातील मंडपातील देखाव्यात काय विराजमान झाला की, त्या घराचं, किंवा मंडपाचं रुपच पूर्ण पालटून जातं.
उत्सवांचा राजा अर्थात गणेशोत्सव आपल्याकडे यंदा अगदी साधेपणाने, शांतपणाने पार पाडत बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलीय. कोरोनाच्या सावटाखालील हा उत्सव असल्याने त्याच्या साजरं करण्यावर अनेक निर्बंध आणावे लागले. एरवी उत्साह, चैतन्याने, उदबत्तीच्या मंद गंधाने भरलेले मंडप यावेळी सॅनिटायझर स्प्रेच्या वासानेही भरले. कारणही तसंच होतं, आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ते आवश्यकच होतं. लाडक्या बाप्पांचा हा उत्सव साजरा होत असताना यावेळी आणखी सावध पावलं टाकणं गरजेचं होतं. अर्थात लाडक्या बाप्पांचं आगमनच इतकं चैतन्यदायी आहे, ऊर्जादायी आहे की, अन्य कार्यक्रम कशाला हवेत, नाही का?
वर्षभरापूर्वी ज्याला आपण 'लवकर या', असं साकडं घातलं तो बाप्पा घरातील मखरात काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवातील मंडपातील देखाव्यात काय विराजमान झाला की, त्या घराचं, किंवा मंडपाचं रुपच पूर्ण पालटून जातं. त्या घराची, मंडपाची शान काही औरच असते. अर्थात कोरोनामुळे यावेळी देखावे, रोषणाई, सजावट यावरही बंधनं होती. त्याचंही भान पाळून उत्सव साजरा करायचा होता. यातूनही मंडळींनी मार्ग काढला. मग कुणी आटोपशीर जागेत चक्क चाळीचा जिवंत देखावा साकारला. ज्यातलं डिटेलिंग मनाला भावणारं होतं. खास करुन माझ्यासारख्या चाळीतलं जीवन हाच श्वास असणाऱ्या गिरगावकरासाठी हा देखावा यंदाचं खास आकर्षण होता. अगदी गॅलरीतील वातावरणापासून ते चाळीतील कपडे वाळत घालण्याची पद्धत, पेपर वाचत बसणारे काका, बच्चे कंपनीला गॅलरीत घेऊन उभी असलेली मंडळी, चाळीची दारं, खिडक्या यातले बारकावे केवळ भन्नाट होते. आम्ही चाळीतली मंडळी तर या सजावटीशी इमोशनली अटॅच झालो. चाळीत दारं-खिडक्यांसोबतच मनंही सदैव सर्वांसाठी उघडी असतात हेही अधोरेखित झालं.
या गणेशोत्सवात काहींनी खडूंवर अष्टविनायक साकारले तर, काही ठिकाणी चक्क आपल्या घरांच्या भिंतींवर बाप्पा रेखाटले. उपलब्ध नियमात बसवून उत्सव उत्तम साजरा होतो, हेच यातून सिद्ध झालं. एकाने तर चक्क आपल्या लग्नाच्या पत्रिकांचा उपयुक्त आणि कौशल्यपूर्ण वापर डेकोरेशनमध्ये केला. ही क्रिएटिव्हिटी मन जिंकणारी होती. कोरोना काळामुळे अनेक नातलग, मित्रपरिवार प्रत्यक्ष जरी बाप्पांकडे येऊ शकले नाहीत, तरी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्हीडिओ कॉलिंगमधून त्यांनी बाप्पांचं ऑनलाईन दर्शन घेतलं. त्याहीवेळी त्यांचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं. कोरोनासारखी महामारीतही इंटरनेटच्या तारांनी जुळवलेला हा भक्तीचा धागा किती घट्ट आहे ते पाहायला मिळालं. एरवी स्नेहसंमेलन, महाआरतीने दुमदुमणारे मंडप यंदा बरेचसे शांत होते. त्याची काहीशी रुखरुख होतीच. सार्वजनिक गणेशोत्सवात खास करुन चाळीच्या उत्सवात, जिथे अनेक जण शरीररुपाने जरी दुसरीकडे राहायला गेले असले तरी मनाने चाळीतच असतात, वर्षानुवर्षे. त्यातही सणासुदीच्या काळात तर हमखास. त्यांच्यासाठी वर्षातला हा एक दिवस अत्युच्च आनंदाचा, अनेक क्षण वर्षभरासाठी मनाच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा सोहळा असतो आणि चाळीत राहणाऱ्यांसाठीही त्यांचं आदरातिथ्य करण्याचा, त्यांची भेट घेण्याचा हा क्षण म्हणजे अविस्मरणीय अनुभूती असते. त्यातही जो वयोगट चाळ सोडून गेलेला आहे, तो सध्या साठी, सत्तरी आणि ऐशीच्या घरातला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बाप्पांचं दर्शन न घेता आल्याने त्यांच्या मनात होणारी घालमेल आपण समजू शकतो. त्याच वेळी कार्यकर्त्यांच्या मदतीने होणाऱ्या ऑनलाईन दर्शनाने त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू, पाणावलेल्या नेत्रकडा या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्याबद्दलचा ओलावा किती गडद आहे याचंच निदर्शक आहे. चाळीचे टॉवर होताना आजूबाजूला आपण पाहतोय. त्याच काळात एका उत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित न राहता येण्याची बोच किती मोठी आहे, हे चाळ सोडून गेलेल्याला किंवा सध्या चाळीत राहणाऱ्याला अगदी नेमकं कळू शकतं.
सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यकर्ता हा मॅनेजमेंटचं उत्तम शिक्षण घेत असतो. म्हणजे वेळ, पैसा यांच्या नियोजनासोबतच मॅन मॅनेजमेंट अर्थात निरनिराळ्या स्वभावाच्या, वागणुकीच्या व्यक्तींशी जुळवून घ्यायला तुम्ही शिकता ते याच उत्सवात. एखाद्या मॅनेजमेंट कोर्सचं इतकं प्रॅक्टिकल शिक्षण कदाचित दुसरं कुठेही मिळणार नाही. गणेशोत्सव मंडळात एखादी व्यक्ती केवळ कार्यकर्ता म्हणून घडत नसते तर, आयुष्याच्या वाटचालीतही व्यक्ती म्हणून त्याची बांधणी होत असते. जी पुढे जाऊन त्याला खूप उपयुक्त ठरते. चाळीतला गणेशोत्सव जरी मंडपात साजरा होत असला तरी अस्सल कार्यकर्त्यांच्या आणि चाळीतील रहिवाश्यांच्या तो नसानसात असतो. म्हणूनच जेव्हा अनंत चतुर्दशीला बाप्पांना निरोप दिल्यावर, मंडपातील रिकामा चौरंग आयुष्यातील रितेपणाची जणू जाणीव करुन देतो, तेव्हा मन गलबलून येतं.
यंदाच्या वर्षी विसर्जनाच्या पद्धतीतही बदल करावे लागले. काही मंडळींनी आपापल्या चाळ, कम्पाऊंडच्या परिसरात टब ठेवून, कृत्रिम तलाव तयार करुन मूर्तींचं विसर्जन केलं. यामुळे प्रशासनावरचा ताण किती कमी झाला, लोकांनी चौपाटीवर न गेल्याने वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कसा कमी झाला, यासारखे मुद्दे लक्षात घेता, लोकांनी हे कायमस्वरुपी स्वीकारल्यास तसंच प्रशासनानेही हे नियमितपणे अंमलात आणल्यास हा भविष्यातील काळासाठी ट्रेंड होऊ शकतो. यामध्ये त्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेची, आरोग्याची घ्यायची अधिकची दक्षताही आलीच.
आता, कोरोनाचं हे विघ्न लवकर दूर करा, सर्वांना दीर्घायुरारोग्य लाभू दे. पुढच्या वर्षी लवकर या. अन् हा उत्सव अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध पद्धतीने आमच्याकडून करवून घ्या. हीच बाप्पांचरणी प्रार्थना.
अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग :