एक्स्प्लोर
Advertisement
BLOG : 'बोलका आदर्शवाद' : सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज
सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचा जगण्यातून आदर्शवाद, आईचे अंत्यसंस्कार सुरू असताना सत्यपाल महाराजांचं सुरू होतं किर्तनातून समाजप्रबोधन. सत्यपाल महाराजांच्या आईचं वृद्धापकाळानं निधन. देहदान करीत पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाला दान.
21 फेब्रूवारी 2020, रात्री सातच्या सुमारासची वेळ. वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावातील कीर्तनाचा मंडप नागरिकांच्या गर्दीनं अगदी फूलून गेलेला. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांच्या खंजेरीतून आज कोणता सामाजिक जागर होणार? याची उत्सुकता कीर्तनासाठी आलेल्या आबालवृद्धांना होती. महाराजही कीर्तनासाठी व्यासपीठावर जाण्यासाठी सज्ज होते. तितक्यात सत्यपाल महाराजांचा फोन वाजला. पलिकडून सांगण्यात आलं, 'आई गेली'...
फोन ठेवताच सत्यपाल महाराजांनी गच्च डोळे मिटले. आईच्या आठवणींनी त्यांचा बांध फुटला. आपल्या कीर्तनातून समाजाला हसवणारे, अंतर्मूख करणारे सत्यपाल महाराज यावेळी मात्र धाय मोकलून रडत होते. कारण, त्यांच्या आयुष्याला वळण आणि संस्काराची सावली देणारा 'आई' नावाचा वटवृक्ष उन्मळून पडला होता. एकीकडे कीर्तनासाठी जमलेली अफाट गर्दी आणि दुसरीकडे आई गेल्याचं आभाळभर दु:ख. अनेकांनी महाराजांना कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला. ही सत्यपाल महाराजांची कसोटी पाहणारा क्षण होता. महाराजांसोबतचे सर्वच नि:शब्द होते. त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली होती.
मात्र, त्याचक्षणी सत्यपाल महाराजांनी स्वत:ला सावरलं. "मी कीर्तन रद्द करणार नाही. मी कीर्तन करूनच अकोटला जाणार. आईला कीर्तनातूनच श्रद्धांजली देणार. आईनंच मला समाजसेवेचे संस्कार आणि वारसा दिला". सत्यपाल महाराजांच्या या वैचारिक निग्रहाचं उपस्थितांना मोठं नवल वाटलं अन् अभिमानही वाटला. सत्यपाल महाराजांवर बालपणापासून आई सुशीलानं संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार बिंबवलेत. आई सुशीलानं तरूणपणात अनेकदा गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची किर्तनं ऐकलीत. तेच विचार तिनं सत्यपालमध्ये पेरलेत.
गाडगेबाबांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आज सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही आला होता. एका किर्तनाच्यावेळी गाडगेबाबांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती त्यांना कळली. मात्र, त्यांनी मुलाचा मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवत कीर्तनाला सुरूवात केली. त्यांनी किर्तनाची सुरूवातच "असे मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी", असं म्हणत समाजप्रबोधनाचा जागर केला.
सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही त्यांच्या वैचारीक दैवताच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग दुर्दैवानं आला होता. तरोड्यात लोकांनी खच्चून भरलेलं मैदान सत्यपालच्या सात खंजेऱ्यांनी निनादून गेलं. "माय-बापहो!, म्हातारपणात माय-बापाची आबाळ नका होऊ देऊ. त्यायच्या मूळंच तूमचा जगात मान हाय. चारी धामाचं सुख माय-बापाच्या सेवेत हाय. बापहो!, कोणत्याही माय-बापाले वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नका". किर्तनात अनेकदा सत्यपाल महाराजांचा हूंदका अनेकदा दाटून आला. कीर्तनाच्या शेवटी सत्यपाल महाराजांनी आपल्या स्वर्गीय आईला अभिवादन केलं.
पुढे आणखी मोठी कसोटी होती. सत्यपाल महाराजांच्या आईचं देहदान करायचा निर्णय झालेला होता. सहा तासांच्या आत देहदान करणं वैद्यकीय कारणांनी आवश्यक होतं. अन् तेव्हढ्या वेळात सत्यपाल महाराजांना अकोटला पोहोचणं शक्य नव्हतं. अखेर महाराजांच्या अनुपस्थितीतच आईचं अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आलं. सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातलं 'सुशीला' नावाचं सतत धगधगतं असणारं अग्नीकुंड वयाच्या 93 व्या वर्षी शांत झालं होतं. ज्या आईच्या ममतेच्या पदराखाली आयुष्याची 65 वर्ष काढलीत, त्याच आईचं अंत्यदर्शन महाराजांना घेता आलं नाही. मात्र, 'आई' नावाच्या विद्यापीठाच्या आदर्श संस्कारांनी सत्यपाल महाराजांना एव्हढ्या कसोटीच्या प्रसंगात आपला आदर्शवाद प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद दिली.
सत्यपाल महाराजांचं पुर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातलं सिरसोली हे त्यांचं गाव. घरी अठराविश्व दारिद्र्य असताना विश्वनाथ आणि आई सुशीलानं विचारांची मोठी श्रीमंती या दांपत्यानं आपल्या लेकरांना दिली. खंजेरी घेण्याची ऐपत नसलेल्या सुशीलाबाईनं फुटलेल्या मडक्यावर कागदं चिकटवत छोट्या सत्यपालला खंजेरी बनवून दिली. पुढे याच सत्यपालनं विचार, संस्कारांच्या विचारांचा 'गजर' आणि 'जागर' आपल्या सात खंजिऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात केला. आपल्या किर्तनातील 'सत्यवाणी'तून सत्यपाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, दारूबंदी, अनिष्ट रूढींवर कठोर प्रहार केलेत. कधीकाळी फक्त दैववादाची पेरणी करणाऱ्या कीर्तनाला त्यांनी सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची पेरणी करणारं माध्यम बनवलं. ते विचार स्वत:ही आचरणात आणलेत. त्यामुळेच किर्तन क्षेत्रातील 'सिलेब्रिटी' असणारे सत्यपाल महाराज आजही स्वत:चा खर्च भागविण्यासाठी आजही कपडे विकतात. पाच वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचंही देहदान सत्यपाल महाराजांनी करीत आपण कृतिशील आदर्शवादी असल्याचं समाजाला दाखवून दिलं होतं. आई जिवंत असतांनाच तिच्या नावानं 'माय सुशीला' नावानं अॅम्बुलन्स सुरू करणारा, स्वखर्चातून सिरसोली या आपल्या गावात आईच्या नावाचं प्रवेशद्वार उभारणारा हा मुलगा.
'आदर्शवाद' सांगणं अतिशय सोप्प अन् सरळ. मात्र, तो स्वतः जगणं, पाळणं अन् त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच कठीण. म्हणूनच विचारांची दिशा स्पष्ट अन् प्रांजळ असणार्या सत्यपाल महााजांचं वेगळेपण म्हणूनच कृतिशील आदर्शवादाची शिकवण देणार ठरलंय. महाराजांचा हा कृतिशील आदर्शवाद हा एका चांगल्या विचारांची नांदी ठरणारं आहे.
महाराज!, अलिकडचा काळ समाजासाठीचा 'संक्रमन काळ'. अलिकडच्या काळातील काही घटनांनी समाजमन पार ढवळून गेलेलं. अशा परिस्थितीमुळं सारं आकाशच अंधारून गेलं असं वातावरण आहे. मात्र, तुमच्यासारखे या अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही दुवे समाजात आहेत. त्यामुळेच आजही समाजात सकारात्मक विचार, चांगुलपणा टिकून आहे. विचारांचा वारसा जपणारे सत्यपाल महाराज हे नाव अलिकडच्या काळातील गल्लाभरू महाराजांच्या गर्दीत आजही तेजानं अन् अभिमानानं आपलं स्वत्व टिकवून आहेत. 'माय सुशीला'च्या संघर्ष, विचार आणि संस्कारांना शतश: नमन!. अन तूमच्या कृतिशील आदर्शवादासही मानाचा मुजरा अन् सलाम...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement