Rishabh Pant : बांगलादेश दौरा पंतसाठी 'लास्ट चान्स?' खराब प्रदर्शन केल्यास पडावे लागू शकते टीम इंडियातून बाहेर, पाहा आकडेवारी
Team India : भारताचा युवा यष्टीरक्षक गोलंदाज ऋषभ पंत मागील काही काळापासून मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरी करत असल्याचं दिसून आलं आहे.

Rishabh Pant in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India Tour of Bangladesh) आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करत आहेत, पण सर्वांच्या नजरा मात्र विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) असतील. कारण एक महत्त्वाचा खेळाडू असूनही मागील बऱ्याच काळापासून पंत खराब फॉर्मात आहे, टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही पंतने निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे आता बांगलादेश दौऱ्यातही तो फ्लॉप राहिल्यास टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
ऋषभ पंत हा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये बराच स्ट्रगल करत असल्याचं दिसत आहे. त्यात बांगलादेशचा संघ सध्या खास फॉर्मात नसल्याने ऋषभ पंतला पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी आहे. पण तो यात अयशस्वी झाल्यास त्याला मर्यादीत षटकांसाठीच्या भारतीय संघातून बाहेर जावे लागू शकते. दरम्यान पंतवर होणाऱ्या या साऱ्या टीकांवर उत्तर देताना तो म्हणाला होता की, तो फक्त 25 वर्षांचा आहे, जेव्हा तो 30-32 वर्षांचा होईल, तेव्हा त्याच्या कामगिरीची तुलना इतरांसोबत व्हायला हवी. ऋषभ पंतच्या या वक्तव्यानंतर तो दडपणाखाली असल्याची चर्चा होत असून अशामध्ये आता त्याचा परफॉर्मन्स बांगलादेशविरुजद्ध कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संजू आणि ईशानही रेसमध्ये
सध्या भारतीय संघात बरेच युवा खेळाडू असून संजू सॅमसन आणि ईशान किशन या यष्टीरक्षक फलंदाजांना फारशा संधी मिळालेल्या नाहीत. धोनीनंतर पंतच विकेकिपर म्हणून दिसत आहे. पण अलीकडे पंत सातत्याने मिळालेल्या संधी गमावत आहे. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत ऋषभ पंत फ्लॉप ठरल्यास त्याला टीम इंडियातून वगळले जाऊ शकते, असं मत काही क्रिकेट तज्ज्ञ देत आहेत.
आकडेवारी काय म्हणतेय?
मागील 9 डावांत ऋषभ पंतच्या बॅटमधून केवळ 96 धावा आल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 11 च्या खाली आहे. तर सर्वोच्च धावसंख्या 27 धावा इतकी आहे. पण पंतने कसोटी फॉर्मेटमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्याचं दिसून आलं आहे. असं असलं तरी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 34.60 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत. तर 66 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 22.43 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
