Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आरोपी कराडला कोर्टातून (Court) पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड (Beed) जिल्ह्यात यावं, असं म्हटलं. तर, काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळे, बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळाला.
बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचं म्हणत त्यांचे समर्थन केले, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यानंतर, पोलीस व इतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.