ICC Playing XI Of World Cup : ICC कडून वर्ल्ड कपचा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर; टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा समावेश, रोहित कर्णधार
ICC Playing XI Of World Cup : आयसीसीने वर्ल्ड कपनंतर आपला सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केला आहे. या संघाची धुरा आयसीसीने रोहित शर्माकडे सोपवली आहे. या संघात टीम इंडियाच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे.
ICC Playing XI Of World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) 2023 चा सर्वोत्कृष्ट वर्ल्ड कप संघ (ICC World Cup Team) जाहीर केला आहे. आयसीसीच्या संघात टीम इंडियाच्या (Team India) सहा खेळाडूंचा समावेश आहे. तर, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) आयसीसीच्या संघात स्थान मिळाले नाही. आयसीसीने रोहित शर्माला (Rohit Sharma) आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार खेळीने लक्ष वेधून घेणारा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रविंद्र याला देखील आयसीसीच्या संघात स्थान मिळाले नाही. त्याशिवाय, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनादेखील आयसीसीच्या संघात स्थान मिळाले नाही.
टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना आयसीसीच्या संघात स्थान
रोहित शर्माने यंदाच्या स्पर्धेत सलामीला येत स्फोटक फलंदाजी केली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 597 धावा केल्या. भारताकडून या विराट कोहलीनंतरच्या सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितचा स्ट्राइक-रेट 125.94 इतका राहिला. स्पर्धेतील कोणत्याही आघाडीच्या चार फलंदाजांपेक्षा सर्वाधिक होता. स्पेशलिस्ट फलंदाजांमध्ये फक्त ग्लेन मॅक्सवेल आणि हेनरिक क्लासेन यांनी जलद गतीने धावा केल्या.
आयसीसीच्या संघात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. संघात समावेश असलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा केल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी घेतले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.
टीम इंडियाचे सहा, श्रीलंकेचा एक, न्यूझीलंडचा एक, दक्षिण आफ्रिकेचा एक आणि विजेतेपद विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम संघात समावेश आहे,
श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा डी कॉक या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 4 शतके झळकावली आहेत. त्याशिवाय डॅरिल मिशेलने 9 डावात 552 धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने 23 आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने 21 विकेट घेतल्या आहेत.
ICC चा 2023 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट संघ :
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी.