Graham Thorpe : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थोर्पनं जीवन संपवलं, सात दिवसानंतर पत्नीनं दिली धक्कादायक माहिती
Graham Thorpe : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थोर्प यांच्या निधनाला सात दिवस झाल्यानंतर त्यांची पत्नी अमांडा थोर्प यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : इंग्लंडचे (England) दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम थोर्प (Graham Thorpe) यांचं निधन 5 ऑगस्ट 2024 रोजी झालं होतं. ग्रॅहम थोर्प यांचं वयाच्या 55 व्या वर्षी निधन झालं होतं, मात्र निधनाचं कारण समोर आलं नव्हतं. ग्रॅहम थोर्प यांच्या निधनाला 7 दिवस झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमांडा थोर्प (Amanda Thorpe) यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. ग्रॅहम थोर्प यांनी डिप्रेशन आणि एनझायटीमुळं जीवन संपवल्याची माहिती अमांडा यांनी दिली. ग्रॅहम थोर्प यांनी दोन वर्षापूर्वी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, असं देखील त्यांनी सांगितलं.
ग्रॅहम थोर्प यांच्या निधनाचं खरं कारण समोर
ग्रॅहम थोर्प यांनी इंग्लंडकडून 100 कसोटी आणि 82 वनडे खेळल्या आहेत. इंग्लंडकडून त्यांनी 12 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं होतं. अमांडा यांनी टाइम्ससोबत बोलताना ही माहिती दिली. अमांडा म्हणाल्या की, ग्रॅहम थोर्प पत्नी आणि दोन्ही मुलींवर प्रेम करत होते. कुटुंब देखील त्यांच्यावर प्रेम करत होतं. मात्र, ग्रॅहम त्यातून बरे झाले व्हते. गेल्या काही दिवसांमध्ये ते आजारी होते, त्यांना वाटायचं की त्यांच्याशिवाय आम्ही चांगलं जीवन जगू, असं अमांडा थोर्प म्हणाल्या. ग्रॅहम थोर्प यांनी स्वत:चं जीवन संपवल्यामुळं दु:खी असल्याचं अमांडा थोर्प म्हणाल्या. गेल्या काही वर्षांपासून ग्रॅहम थोर्प डिप्रेशनचा सामना करत होते,मे 2022 मध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते अनेक दिवस आयसीयूत होते, असं अमांडा थोर्प यांनी सांगितलं.
उपचार करुनही उपयोग नाही...
ग्रॅहम थोर्प डिप्रेशनमधून बाहेर पडतील, अशी आशा होती मात्र तसं झालं नव्हतं. आम्ही कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी होतो. ग्रॅहम थोर्प यांनी अनेक उपचार केले मात्र त्याचा उपयोग झाला नाही, अमांडा थोर्प म्हणाल्या.
अमांडा थोर्प यांनी पुढं म्हटलं की, ग्रॅहम थोर्प मैदानावर मानसिकदृष्ट्या मजबूत असायचे, त्यांची प्रकृती देखील चांगली असायची. ग्रॅहम थोर्प यांच्या मोठ्या मुलीनं आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, आम्ही त्यांनी बरं व्हावं यासाठी खूप मदत केली, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ग्रॅहम थोर्प यांच्या निधनाचं कारण सांगण्याची वेळ आलीय, ते धक्कादायक असलं तरी सांगितलं पाहिजे, असं वाटल्याचं त्या म्हणाल्या. या आजारांविषयी देखील जनजागृती करण्याची गरज असल्याचं देखील थोर्प यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं.
इतर बातम्या :