BCCI on Gautam Gambhir : मायदेशात माती खाल्ल्यानंतर BCCI नाराज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर गौतम गंभीरची होणार हकालपट्टी?
या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काही मोठे निर्णय घेऊ शकते.
BCCI on Gautam Gambhir : तीन महिन्यांपूर्वी राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या कोचची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या की तो टीम इंडियासाठी काय तरी चांगले करेल. पण संघाने आधी श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली आणि आता न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात 0-3 ने माती खाल्ली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाने 3 किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला घरच्या मैदानावर क्लीन स्वीप केले आहे. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काही मोठे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे प्रशिक्षक गंभीरवर दबाव निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची मोठ्या थाटामाटात नियुक्ती करण्यात आली. यासोबतच संघ निवडीच्या बाबतीतही गंभीरला भरपूर स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, गौतम गंभीरला असा अधिकार देण्यात आला होता जो त्याच्या आधी रवी शास्त्री आणि राहुल द्रविडकडेही नव्हता. बीसीसीआयचे नियम प्रशिक्षकांना निवड समितीच्या बैठकींमध्ये सहभागी होऊ देत नाहीत, परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड समितीच्या बैठकीतही त्याचा समावेश करण्यात आला होता. सूत्राने पुढे सांगितले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली नाही, तर तो भविष्यात संघाशी संबंधित गोष्टीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकणार नाही.
प्रशिक्षक केवळ संघासोबत नियोजन करू शकतो, पण फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाजांची कमजोरी माहीत असूनही, मुंबईतील फिरकीपटूंना पूर्णपणे अनुकूल अशी खेळपट्टी निवडल्याबद्दल त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्येक खेळपट्टीचा मूड वेगळा असतो. गंभीरला प्रत्येक परिस्थितीत खेळाडूंकडून समान दृष्टीकोन हवा आहे, जो भारतीय क्रिकेटशी जवळच्या लोकांसाठी देखील समजणे कठीण आहे. मुंबईतील न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला नाईटवॉचमन म्हणून पाठवणे किंवा सर्फराज खानला पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे ही काही धोरणात्मक पावले आहेत ज्यावर प्रत्येकजण प्रश्न उपस्थित करत आहे. गंभीरच्या विनंतीनुसार, केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि आयपीएल संघाचा एसआरएच अष्टपैलू नितीश रेड्डी याची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संघात निवड करण्यात आली आहे. असे केल्याने अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत.
गंभीरने पदभार स्वीकारल्यानंतर भारताने 27 वर्षांत प्रथमच श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली. न्यूझीलंडने 1988 नंतर पहिली कसोटी जिंकली, यासोबत भारतीय संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. याआधी भारताला तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या मालिकेत स्विप करता आले नव्हते. ऑस्ट्रेलिया मालिका गंभीरसाठी कठीण परीक्षा असेल कारण त्याला काही दिग्गज खेळाडूंचा बचाव करावा लागेल तसेच त्यांना आरसा दाखवावा लागेल कारण बोर्ड त्याच्यावर बारीक नजर ठेवून आहे.