Yavatmal News : महाठग मीरा फडणीस अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; सहा जणांची केली होती 47 लाखांनी फसवणूक
Yavatmal : केंद्र शासनाच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या महाठग मीरा फडणीस या महिलेला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
Yavatmal News यवतमाळ : केंद्र शासनाच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या महाठग मीरा प्रकाश फडणीस या महिलेला अटक करण्यात अखेर पोलिसांना (Yavatmal Police) यश आले आहे. यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात उत्तर प्रदेशातील एका साथीदाराला सोबत घेऊन या महिलेने 6 जणांची 47 लाख रूपयाने फसवणूक केली होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट 2023 मध्ये सचिन धकाते यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अनिरूध्द आनंदकुमार होशींग (रा.वाराणसी) याला अटक करण्यात आली होती. तर तेव्हापासून मीरा फडणीस पसार होती.
अखेर या प्रकरणी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने अमरावती येथून मीरा फडणीस या महिलेला देखील अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीच्या (Yavatmal Crime) प्रकरणाच्या तपासातून तब्बल 1 कोटी 42 लाखांची फसवून झाल्याचे उघडकीस झाले आहे. तर उत्तरप्रदेश आणि राज्याची मिळून ही रक्कम 10 कोटींच्या घरात जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नेमके प्रकरण काय?
मीरा प्रकाश फडणीस (वय 52 रा. अभंग गणेश विहार जगदाळे ले-आऊट, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या महाठग महिलेचे नाव आहे. मीरा फडणीस या सर्वांना आपण स्वतः पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, फडणीस यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या सचिन धकाते या तरुणाची भेट घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. सचिन धकाते हे चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात असून तो मीरा फडणीस या महिलेला पाच वर्षांपासून ओळखत होता. कालांतराने सचिन यांचा मित्र चेतन भिसे हा देखील महिलेच्या संपर्कात आला. फडणीस या महिलेने आपली पर्यटन मंत्रालयाच्या निर्देश सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याचे सांगून पर्यटन विभागातील अधिकारी अनिरुद्ध होशिंग ओळखीचा असल्याचे सांगितले.
पर्यटन मंत्रालयाच्या विविध योजना असून त्यात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष सचिन धकाते यांना दाखवले. यात सचिनचा विश्वास बसावा यासाठी पर्यटन विभागातील अधिकारी असलेल्या होशींग सोबतचे फोटो देखील दाखविण्यात आले होते. त्यानंतर विश्वास संपादन करून सचिनसह इतर 6 जणांची अशाच प्रकारे 47 लाखाने फसवणूक करण्यात आली होती.
सहा जणांची केली होती तब्बल 47 लाखांनी फसवणूक
या प्रकरणात 10 ऑगस्ट 2023 मध्ये सचिन धकाते याने अवधूतवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून हे प्रकरण उजेडात आणले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असता, अवधूतवाडी पोलीस आणि नागपूर पोलिसांनी मिळून अनिरुद्ध होशिंग याला अटक केली होती. मात्र मीरा फडणीस ही अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होती. दरम्यान, तीने न्यायालयात धाव घेत आपला जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तिचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या आदेशाविरोधात ती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेली. तेथे न्यायालयाने अंतरिम जामीन दिला.
मात्र दोन दिवसापूर्वी तिचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून ती पसार होती. तर दुसरीकडे फसवणूक झालेल्या तक्रारदारांकडून फडणीस हिच्या अटकेसाठी हालचाली करण्यात आल्या. त्यामुळे अखेर आर्थिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मीरा फडणीस हिला मंगळवारी अटक केली. या प्रकरणी आज मीरा फडणीस हिला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणात फसवणूक करून लुबाडण्यात आलेली रक्कम परत मिळविण्याचा देखील प्रयत्न करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या