Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
Kalyan Marathi family beaten: कल्याणच्या योगीधाम परिसरामध्ये अजमेरा हाइट्स या सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली होती.
कल्याण: मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एकापाठोपाठ एक कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) हा अजमेरा हाईटस् सोसायटीतील रहिवाशांना सनदी अधिकारी (IAS officer) असल्याचे सांगून धमकावत होता. तो खासगी गाडीवर अंबर दिवा लावून टेचात फिरायचा. अखिलेश शुक्ला आयएएस अधिकारी सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शुक्ला त्याच्या खासगी गाडीमध्ये अंबर दिवा लावून रुबाब करत होता. मात्र, त्याचा हाच रुबाब आता पोलिसांनी उतरवला आहे.
कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी जप्त केली आहे. या गाडीमधून अंबर दिवा देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंबरनाथ वाघमोडे यांनी गाडीची तपासणी केली असून गाडीतून अंबर दिवा जप्त केला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शुक्लाच्या गाडीला 9500 रुपयांचा दंड
कल्याण आरटीओने शुक्ला वापरत असलेल्या गाडीला दंड आकारला आहे. 9500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे दिवा जप्त करून गाडीचा ताबा घेण्यात आला आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खासगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही ही गाडी गेली चार वर्ष रस्त्यावर धावत आहे. त्याचप्रमाणे अधिकार नसतानाही बेकायदेशीर रित्या या गाडीमध्ये अंबर दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अंबर दिवा जप्त करून गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. यानंतर अखिलेश शुक्ला याच्यावर आणखी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अखिलेश शुक्लावर तात्काळ निलंबनाची मागणी
अखिलेश शुक्ला हा अजमेरा हाईटस् सोसायटीतील अनेक रहिवाशांना त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मुंबईत संतापाची लाट उसळली होती. या सगळ्या प्रकाराची नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात दखल घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला यांना तात्काळा प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली होती. एमटीडीसी मधे काम करणारा शुक्ला हा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरु करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
आणखी वाचा