Sangli Jat Water Issue : जत तालुक्यात पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा एल्गार; कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा पाणी संघर्ष समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा
Sangli News : जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता जत तालुक्यातील पूर्व भागात लोकांनी कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे.
सांगली : जत (JAT) तालुक्याच्या पूर्व भागातील आणि सीमावर्ती भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न हा दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. तसेच, या भागासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मंजूर केलेली विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला देखील अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या भागातील लोकांसाठी शेवटचा पर्याय हा कर्नाटकात (Karnataka) सामील होण्याचा असणार असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच, या भागामध्ये कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा आणि कानडी फलक लावण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
म्हैसाळ योजनेचं काम अजूनही सुरु नाहीच
काही महिन्यांपूर्वी पूर्व भागातील जनतेने आंदोलन केल्यानंतर आणि कर्नाटकात जाण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर या बैठकीमध्ये म्हैसाळ योजनेतून पाणी देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नऊशे पन्नास कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं गावकऱ्यांना सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अजूनही कोणतचं काम सुरु नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असल्याचं सांगण्यात येत आहे.
जर कर्नाटकात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, शेतीला पाणी दिले जात आहे तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया पाणी संघर्ष समितीने दिली आहे. तसेच जर जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण निविदा काढून म्हैसाळ योजनेच्या कामाला सुरुवात न केल्यास कर्नाटकात सामील होण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावा या समितीकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच जनआंदोलन उभं करुन कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करू, कर्नाटकात जाऊ. तसेच सीमेवर आणि प्रत्येक गावामध्ये कन्नड भाषेतील फलक लावू असा इशारा आता देण्यात आला आहे.
राज ठाकरे यांना संतप्त नागरिकांचा सवाल
जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाने येथील नागरिक संतप्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या गावकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील सवाल विचारला आहे. महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी आग्रह धरणारे आणि प्रयत्न करणारे मनसेचे अध्यक्ष जत गावकऱ्यांच्या या इशाऱ्याबाबत कोणती भूमिका घेणार असा सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडेही आता गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई - गोवा महामार्गासाठी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे आता जत तालुक्यासाठी काही भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.