Anil Parab : मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं, अनिल परब यांचा सभागृहात हल्लाबोल, उद्धव ठाकरे गालातल्या गालात हसले!
Anil Parab Vidhan Parishad Speech : आम्ही मटण खायचं का नाही, मांसाहार करायचा का नाही हे आता तुम्ही ठरवणार का? आपल्याला काय खायचं हा अधिकार राज्यघटनेने दिला आहे असं अनिल परब म्हणाले.

मुंबई : हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, पण ते करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आम्हची शिकवण आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले. विधान परिषदेत बोलताना त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असा टोला अनिल परब यांनी लगावला. जाती-जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. विधान परिषदेत अनिल परब बोलताना त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे उपस्थित होते.
हा नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतोय
अनिल परब म्हणाले की, "हल्ली काय झालं आहे की मांसाहार खायचं नाही असं कोणीतरी म्हणतं. त्यांना हा अधिकार कुणी दिला? मटण कोणतं खायचं, झटका मटण खायचं की हलाल खायचं हे तुम्ही सांगणार का? एक मंत्री सांगतो आपण काय खायचं आणि काय खायचं नाही. राज्यात हिंदू मुस्लिम वाद होतील असं वातावरण आहे. माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो जागते राहतो. त्याला वाटत त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे. पण तसं नाही. सध्या असंच एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतोय आणि मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं सांगत आहे. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत."
आपल्याला जगायचं कसं, बोलायचं काय, राहायचे कसं यावर घटना भाष्य करते. मला बोलण्याच स्वातंत्र्य मिळाल आहे. पण हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी काहीही बोलू शकत नाही. सध्या असं होतं नाही. आता कोणीही उठतंय, देवाची विटंबना कर, महापुरुषांची विटंबना कर असा प्रकार सुरू आहे असं अनिल परब म्हणाले.
आम्हाला निधीच दिला जात नाही
अनिल परब म्हणाले की, "निधीच समान वाटप हा घटनेने दिलेला अधिकार आहे. केंद्र सध्या राज्याच्या बाबत निधी वाटपात दुजाभाव दाखवत आहे. आता राज्यात सुद्धा असाच प्रकार सुरू झाला आहे. माझ्या मतदार संघात 100 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. आता त्याठिकाणी निधी दिला जात नाही. आम्ही काम करायचं नाही का? एका वॉर्डात निधी दिला जातो आणि दुसऱ्या वॉर्डात निधी दिला जात नाही."
विरोधी पक्षनेता का दिला जात नाही?
अनिल परब म्हणाले की, "खालच्या सभागृहात आम्हाला अद्याप विरोधी पक्षनेता दिला नाही. का दिला नाही हे आम्हाला लिहून द्या असं आम्ही अध्यक्षांना बोललो. पण ते यावर बोलायला तयार नाही. आम्ही काय गुन्हा केला आहे सांगव. आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणून होत नसेल तर तसं लिहून द्या. पण तेही करत नाही."
सभापती विरोधकांचा आवाज दाबतात
अनिल परब म्हणाले की, "आम्ही विधानपरिषद सभापती यांच्यावर अविश्वास दाखल केला आहे. कारण ते आम्हाला बोलू देत नाही. प्रत्येक ठिकाणी चिरडण्याचं काम ते करत आहेत असं अनिल परब म्हणाले. ते म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लागला नाही. जस्टीस डिले इज जस्टीस डिनाय. आम्ही अल्पसंख्याक झाल्याने यांना सत्तेचा माज दिसतोय. बोलून द्यायचे नाही, विरोधकांना उडवून लावले जात आहे, चेपले जात आहे. आम्ही उपसभापतीवर अविश्वास ठराव आणला. नियमानुसार तो प्रस्ताव घेतला पाहिजे होता. पण तो तुम्ही नाकारला. तो कोणत्या कायद्याने नाकारला हे तरी दाखवा. आमचा अविश्वास प्रस्ताव नाकारला आणि लगेच तुम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. केवळ तुम्ही घटनापीठावर बसलेला आहात त्यामुळे तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे आता आम्ही थेट सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे."
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
